Pimpri: महापालिकेची सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयामधील नियंत्रणाच्या कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 500 रुपये दंड ठोठावला असून निवत्तीवेतनातून ही दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. डॉ. गोरे महापालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. पाच ते सहा महिन्यांपूर्वी ते महापालिकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. पशुवैद्यकीय अधिकारीपदी कार्यरत असताना डॉ. गोरे यांच्याकडे संभाजीनगर येथील महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाची जबाबदारी होती. संग्रहालयामध्ये सर्पमित्रांच्या कामकाजावर नियंत्रण न ठेवणे, सर्पमित्रांना नेमून दिलेल्या कामाप्रमाणे पकडण्यात आलेले सर्प वनविभागात सोडणे, आणलेल्या तसेच वनविभागात सोडलेल्या सापांच्या, त्याचबरोबर जिवंत व मृत सर्पांच्या नोंदी न ठेवणे, सर्पमित्रांची उपस्थिती बायोमेट्रीक प्रणालीद्वारे न नोंदवता हजेरी पत्रकात नोंदवून त्यांचे मानधन अदा करणे यासह प्राणी संग्रहालयातील 20 ते 25 सापांच्या मृत्यू प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींच्या अनुषंगाने द्वीसदस्यीय समितीच्या चौकशी अहवालातील निष्कर्षानुसार डॉ. गोरे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत डॉ. गोरे यांच्यावर अंशत: दोषारोप शाबीत झाले होते. त्यावर डॉ. गोरे यांनी आपला खुलासा सादर केला होता. अपुरे मनुष्यबळ आणि अपुरा तांत्रिक कर्मचारी वर्ग, कार्यालयात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील कार्यालयीन कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने केले आहे. त्यामुळे दोषारोप निरस्त करण्याची विनंती त्यांनी केली होती. मात्र, ती विनंती फेटाळत चौकशीतील दोषारोप आणि विभागप्रमुखांची कारवाईची शिफारस विचारात घेऊन आयुक्त हर्डीकर यांनी डॉ. गोरे यांच्यावर कामकाजात हलगर्जीपणा करुन कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे. 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून निवत्तीवेतनातून ही दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. या आदेशाची त्यांच्या सेवापुस्तकात नोंद केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.