Pimpri: सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 46 जणांवर दंडात्मक कारवाई

थुंकणे टाळण्याचे महापालिकेचे आवाहन  

एमपीसी न्यूज – कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असून बाधित व्यक्तींच्या थुंकीद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे महापालिकेने आवाहन करुन देखील सार्वजनिक ठिकाणी थुंकू केलेल्या 46 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 150 रुपयाप्रमाणे सहा हजार 900 रुपये दंड वसूल केला असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

 

ही कारवाई यापुढेही सुरु ठेवण्यात येणार असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पूर्णपणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

जीवघेणा कोरोना विषाणू महाराष्ट्रात दाखल झाला आहे.  विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे तीन रुग्ण पॉझिटीव्ह  आढळले आहेत.  कोरोना हा संसर्गजन्य विषाणू आहे. बाधित व्यक्तींच्या थुंकीद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा प्रसार शहरात होऊ नये याकरिता नागरिकांनी  बस, रेल्वे स्थानक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

थुंकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. 150 रुपये दंड वसूल केला जात आहे.  गुरुवारी महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयामांर्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 46 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 150 रुपये प्रमाणे सहा हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”सार्वजनिक ठिकाणी कोणताही नागरिक थुंकताना आढळल्यास महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे; मात्र दंडात्मक कारवाई करण्याऐवजी नागरिकांनी आपल्या शहरवासीयांचे कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी, स्वतःचे आणि इतरांचे आरोग्य जपण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यापासून परावृत्त व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.