Pimpri: हर्डीकर प्रशासनाने केली शहरातील पाणीपुरवठ्याची प्रयोगशाळा

आठ दिवसात आपलाच निर्णय मागे घेण्याची नामुष्की

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रशासनाने शहरातील पाणीपुरवठ्याची प्रयोगशाळा केली आहे. पाणीकपात रद्द आणि पुन्हा लागू करण्यावरुन हर्डीकर प्रशासन नियोजनपूर्वक निर्णय घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आठ दिवसात पाणी कपात रद्द करण्याचा आपलाच निर्णय मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. ‘पदाधिकारी बोले आणि आयुक्त’ डोले असा कारभार सुरु असून आयुक्तांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका करदात्या नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे अशी टीका केली जात आहे.

शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण गतवर्षी ऑगस्टमध्ये 100 टक्के भरले होते. त्यामुळे पाणीकपात रद्द केली मात्र पावसाने दडी मारली. परतीच्या पावसाने देखील पाठ फिरविली होती. त्यामुळे गतवर्षी शहरवासियांना दिवाळीपासून पाणीकपात सहन करावी लागली. पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा 13 टक्क्यांवर आला होता. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे महापालिका दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णयापर्यंत पोहचली होती. परंतु, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने दोन दिवसाआड पाणीकपात करण्याची वेळ आली नाही.

गतवर्षीचा अनुभव पाठीशी असतानाही हर्डीकर प्रशासनाने पवना धरणात मुबलक पाणीसाठा होताच महापौरांच्या सूचनेवरुन 9 ऑगस्ट रोजी पाणीकपात मागे घेतली. एकदिवसाआड पाणीकपात रद्द करताच पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली. त्यामुळे हर्डीकर प्रशासन आणि महापौर राहुल जाधव यांना देखील पाणीकपात रद्द करण्याचा आपलाच निर्णय चुकल्याचा साक्षात्कार झाला.

आठ दिवसात आपलाच निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला. पाणीकपात रद्द केल्याने पाणी कमी आणि मागणी जास्त झाल्याचे कारण देत आता पुन्हा सोमवारपासून विभागनिहाय पाणीकपात केली जाणार आहे. पाणी कपात रद्द पुन्हा आठ दिवसातच लागू केल्याने हर्डीकर प्रशासनाने शहरवासियांच्या भावनांशी खेळत असून शहरातील पाणीपुरवठ्याची प्रयोगशाळा सुरु केल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.