Pimpri : महापालिकेची 607 राजकीय फ्लेक्सवर कारवाई

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 607 राजकीय फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत. या दैनंदिन कारवाईचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. महापालिका मालमत्ता व आवारातील राजकीय पुढा-यांचे फोटो, बॅनर्स व मतदारांवर प्रभाव पाडू शकणारे लिखाण झाकण्यात आले आहे. त्यामध्ये महापालिका पदाधिका-यांच्या दालनांचा समावेश आहे. ही कार्यवाही अचारसंहिता लागू झाल्यानंतर 24 तासांत करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. याशिवाय शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले पोस्टर्स, बॅनर्स, अनधिकृत फ्लेक्‍स हटविण्यासाठी 48 तासांची मुदत आहे. तर खासगी जागेत लावलेले फ्लेक्‍स हटविण्यासाठी 72 तासांची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, ही मुदत संपल्यानंतरही अनेक राजकीय बॅनर्स आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. शहराच्या विविध भागांत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसात महापालिकेने 607 राजकीय फ्लेक्सवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.