Pimpri : औषध खरेदी आचारसंहितेच्या कचाट्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालये, दवाखान्यांमधून औषध टंचाईची ओरड होत असताना प्रशासनाच्या लेटलतिफ कारभारामुळे खरेदी पुन्हा महिनाभर लांबणीवर पडली आहे. तीन विभागांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांची औषध खरेदीसाठी प्राप्त निविदा मंजुरीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्थायी समितीची मंजुरी मिळविण्यात आडकाठी आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेने तातडीने औषध खरेदी केली. त्यामुळे काही काळ तक्रारी कमी झाल्या होत्या. परंतु, पुन्हा औषध टंचाईच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेची शहरात 8 मोठी रुग्णालये तर 28 दवाखाने आहेत. रुग्णालयांसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी आवश्‍यक औषध व साहित्य खरेदीसाठी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार, शस्त्रक्रिया विभागासाठी 414 प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. एकूण 20 निविदा महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या 18 निविदाधारकांना हे काम देण्यात येणार आहे. 3 कोटी 79 लाख 88 हजार रुपयांचा खर्च महापालिका या खरेदीवर करणार आहे.

याखेरीज सुमारे एक कोटी रुपयांची आयुर्वेदीक औषधे खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेला 12 निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या आठ कंपन्यांकडून औषध खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. दंतरोग विभागासाठी 107 औषध व साहित्याचा समावेश होता. तीन निविदा त्यासाठी प्राप्त झाल्या. त्यापैकी 103 प्रकारचे औषध व साहित्यासाठी महापालिकेला दर प्राप्त झाले. त्यानुसार अडीच लाखांची औषधे व साहित्य दंतरोग विभागासाठी खरेदी केले जाणार आहेत.

वास्तविकतः विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यास मंजुरी मिळविणे आवश्‍यक होते. परंतु, ऐन निवडणुकीच्या तोंडावर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तर आचारसंहिता कालावधीत स्थायी समितीच्या सभेपुढे याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. आचारसंहिता कालावधीत स्थायी समितीच्या सभांना “ब्रेक’ लागल्याने निवडणूक पार पडल्यानंतरच मंजुरी व त्यानंतर खरेदीची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया विभाग, दंत विभाग आणि आयुर्वेदीक उपचार विभागाला औषध व साहित्यांसाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.