Bhosari: कोणाच्या जागा न बळकावता विलास लांडे यांनी समाविष्ट गावांचा विकास केला – गणपत आहेर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेवर समाविष्ट गावांमधून निवडून आलेले नगरसेवक केवळ नावाला नगरसेवक आहेत. यातील एकाही नगरसेवकाला अधिकार नाहीत. त्यांना दाबून ठेवण्यात आले आहे. या मतदारसंघाचा रिंगमास्टर त्यांना मर्जीने काम करू देत नाही. मतदारसंघातील मोकळ्या जागा बळकावल्या जात आहेत. मोकळी जागा दिसल्यास त्यावर तातडीने ताबा मारला जात आहे. ताबा मिळाला नाही तर जागा मालकांवर दबाव टाकून जागेत भागिदारी करण्यासाठी भाग पाडले जात आहे. मतदारसंघात बळावलेली ही हुकूमशाही प्रवृत्ती ठेचायची असेल, तर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे या निवडणुकीत कपबशी चिन्हावर मतदान करून भोसरी मतदारसंघातील मतदारांनी आपले भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन माजी सरपंच गणपत आहेर यांनी शनिवारी (दि. 12) केले.

भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारासाठी चिखलीतील जाधववाडी व कुदळवाडी परिसरात काढलेल्या पदयात्रेत ते बोलत होते. लाडे यांनी या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. कोपरा बैठका घेऊ कपबशीलाच मतदान करण्याचे आवाहन केले. मोकळी जागा दिसली की ताबा मारणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. यावेळी माजी सरपंच गणपत आहेर, मुरलीधर ठाकूर, नितीन सस्ते, गुलाब बालघरे, माऊली मोरे, रोहिदास बालघरे, सिद्धा रोकडे, काळूराम मोरे, चिमणराव बालघरे, माऊली मोरे, गणेश यादव, बाळासाहेब मोरे, नाना बालघरे, सागर यादव, अच्युतराव गंतले, सुंदर रोकडे, लतीफ शेख, ज्ञानोबा मोरे, रमेश मोरे आदी उपस्थित होते.

आहेर म्हणाले, “विलास लांडे हे भोसरी मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार असताना नागरिकांना पूर्ण स्वातंत्र्य होते. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याची मुभा होती. मात्र गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात दहशतीचे वातावरण पसरले आहे. कोणाला काही करू दिले जात नाही. कोणी काही करण्यास गेले की आधी खंडणी गोळा केली जाते. कामगारांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांना दमदाटी केली जाते. सर्वांना दहशतीखाली ठेवून सोशल मीडियावर मात्र विकासकामांचा डांगोरा पिटला जात आहे. कामे केली नाहीत म्हणूनच तर हा असा ढोल बडवला जात आहे. तरूणांना रोजगार देण्याऐवजी हफ्ते वसुलीसाठी त्यांना एक प्रकारे प्रोत्साहनच दिले जात आहे.

मतदारसंघातील तरूणांचे भविष्य आता सुरक्षित राहिलेले नाही. हे सर्व भयानक आहे. विलास लांडे यांनी असे काम कधी केले नाही. मतदारांनीही लांडे यांनी असे काम केल्याचे कधी पाहिलेले नाही. आता जे काही सुरू आहे, ते सर्व भयानकच आहे. हे चित्र नागरिकांनीच आता बदलले पाहिजे. त्यासाठीच ही विधानसभा निवडणूक आहे. विलास लांडे हेच या मतदारसंघाचा विकास करू शकतात. तेच या मतदारसंघातील तरूणांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. त्यामुळे कुदळवाडी आणि जाधववाडीतील मतदार विलास लांडे यांनाच भरघोस मतांनी निवडून देतील, असा विश्वास गणपत आहेर यांनी व्यक्त केला.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.