Pimpri : कचरा गोळा करण्यासाठी महापालिका आकारणार दरमहा शुल्क; ‘असे’ आकारले जाणार शुल्क

घरोघरचा कचरा 60 रुपये, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 90 ते 120

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 90 ते 120 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास दंड केला जाणार आहे. कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार 19 डिसेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 8 एप्रिल 2016 मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 जारी केला आहे.

दुकानदारांकडून दरमहा 90 रुपये, शोरूम, गोदामे, उपाहारगृह आणि हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 120 रुपये, हॉटेलसाठी दरमहा 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 50 खाटापेक्षा कमी क्षमता असलेल्या रुग्णालयासाठी दरमहा 120 रुपये आणि 50 हून अधिक खाटा असलेल्या रुग्णालयासाठी 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शैक्षणिक, धार्मिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय यांना दरमहा 90 रुपये, मंगल कार्यालयांना दरमहा 300 रुपये आणि फेरीवाल्यांकडून 180 रुपये शुल्क दरमहा घेतले जाणार आहे.

ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास पहिल्यांदा 60 रुपये दंड आकारला जाणार आहे. दुसऱ्यावेळी चूक केल्यास 120 रुपये आणि तिसऱ्यांदा चूक केल्यास 180 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. त्यांनतर प्रत्येक चुकीसाठी 180 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण केल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा चूक केल्यास दहा हजार आणि तिसऱ्यावेळी चूक केल्यास 15 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी 15 हजार रुपये दंड असणार आहे. तसेच कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.