Pimpri : हॉटेल मॅनेजरच्या खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – रावेत येथील हॉटेल शिवनेरी येथे जेवणाच्या बिलावरुन हॉटेल मॅनेजरचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. ही घटना मे 2014 मध्ये झाली होती. यातील चार वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

तुषार जिव जोगदंड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मे 2014 रोजी माजी नगरसेवक जालिंदर शिंदे व त्याचे मित्र कुणाल लांडगे, नरेंद्र भोईर, विशाल टिंगरे हे जेवणासाठी शिवनेरी हॉटेलवर गेले. यावेळी तेथे जेवणाच्या बिलावरुन हॉटेल मॅनेजर विशाल दत्तोबा शिंदे यांच्याशी वाद झाला होता. याच भांडणाचा राग मनात धरून जालिंदर शिंदे, कुणाल लांडगे, नरेंद्र भोईर, विशाल वसंतराव टिंगरे, साई उर्फ कौशल विश्‍वकर्मा, बापू उर्फ प्रदीप गाढवे, संतोष उर्फ रुपेश पाटील, राहूल करंजकर, तुषार जोगदंड हे पुन्हा त्या हॉटेलवर गेले व त्यांनी जुन्या रागातून मॅनेजरशी भांडण्यास सुरुवात करत त्याला मारहाण केली व गोळ्या झाडून त्याचा खून केला. याचा पुढील तपास देहुरोड पोलीस करत होते. यातील आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर जोगदंड हा चार वर्षापासून फरार होता.

गुन्हे शाखा युनिट एकच्या तपासी पथकाला जोगदंड हा देहुरोड येथील त्याच्या घरी आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून जोगदंड याला अटक केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस नाईक सचिन अहिवळे, सचिन उगले, प्रवीण पाटील व गणेश सावंत यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.