Pimpri : नवीन पोलीस आयुक्तांची पिंपरी-चिंचवडला धावती भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी नियुक्त करण्यात आलेले पाहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी शुक्रवारी (दि. 3) प्रथमच पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली. या भेटीत त्यांनी आयुक्तालयाच्या तयारीची पाहणी करत अधिकारी व प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना दिल्या.

चिंचवड येथील पोलीस उपायुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव आदी उपस्थित होते. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायाकडे पोलीस बळ कमी आहे. कामाचे योग्य नियोजन केले तर आहे त्या बळामध्ये उत्तम काम होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी दाखवला.

पोलीस आयुक्तालय सुरू करण्याबाबतचे आदेश राज्य शासनाकडून पारित केले जातात. त्या आदेशानुसार आयुक्तालय सुरू करण्यात येते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम सुरू करण्याबाबतचे आदेश अद्याप काढण्यात आले नसून येत्या 10 ते 15 ऑगस्ट पर्यंत हे आदेश येण्याची शक्यता पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी वर्तविली. आयुक्तालयासाठी घेण्यात आलेल्या इमारतीचे अद्याप काम सुरू आहे, त्यामुळे आयुक्तालयाची सुरुवात चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथून होईल, असेही ते म्हणाले.

प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात आली आहे. या इमारतीमध्ये पोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकारी व प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.