Pimpri : कुदळवाडीत लवकरच होणार प्राथमिक आरोग्य केंद्र

स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – भंगारमालाच्या वारंवार गोदामांना आग लागण्याच्या घटनांमुळे कुदळवाडीवासियांचा जीव धोक्‍यात आहे. मात्र, या परिसरात महापालिकेचे साधे प्राथमिक आरोग्य केंद्र देखील नसल्याने नागरिक संताप व्यक्त केल्यानंतर आयुक्तांनी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या मागणीची दखल घेतली. व आरोग्य सेवा व सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी वैदयकीय विभागाचे पथक पाठविले आहे.

कुदळवाडी परिसरात भंगार मालाची गोदामे, लघु उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी हजारो कामगार काम करतात. तसेच बालघरेवस्ती, यादवनगर, पवारवस्ती, सेक्‍टर 16, भैरवनाथनगर, महादेव मंदिर परिसर वस्ती आदी भागामध्ये सुमारे 30 हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. या भागातील नागरीकरण झपाट्‌याने वाढत आहे. बांधकामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मात्र, महापालिकेच्या सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. भंगार मालाच्या गोदामांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे महापालिकेने चिखली परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र देखील उभारले आहे. परंतु, येथील नागरिकांच्या आरोग्य सुविधेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. परिसरात जवळपास महापालिकेचे एकही रुग्णालय नसल्यामुळे रात्री-अपरात्री रुग्णांची गैरसोय होते. सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेचे संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) अथवा भोसरी येथील रुग्णालयात गाठावे लागत होते. कुदळवाडीवासियांचा हा त्रास लवकरच कमी होणार आहे.

या निवेदनाची आयुक्तांनी दखल घेतली असून, महानगरपालिकेच्या वतीने कुदळवाडी येथे आरोग्य सेवा व सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी वैद्यकीय विभागाचे पथक पाठविले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. कर्पे व इतर कर्मचारी यांनी आज गुरुवार (दि. ९) रोजी या ठिकाणी येऊन, जागेची पाहणी केली. तसेच लवकरात लवकर अहवाल तयार करून, तो प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले, असे यादव यांनी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.