Pimpri : नदी पुनरुज्जीवन निविदेचा फेरविचार करा, भाजप नगरसेवकाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाने नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निविदा प्रसिद्धेची घाई केली आहे. त्याला सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आक्षेप घेत घरचा आहेर दिला आहे. तसेच निविदेचा फेरविचार करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव निती आयोगाकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. एवढेच नव्हे तर हे काम सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत केल्यास सुमारे 50 कोटी रुपयांची बचत होणार असताना महापालिकेच्या पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाने नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निविदा प्रसिद्धेची घाई केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील 17 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने निती आयोगाकडे प्रस्ताव पाठविला आहे. महाराष्ट्र स्वच्छ नदी अभियानांतर्गत या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी 3800 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाने राज्यातील 77 नद्यांपैकी 17 नद्यांच्या 21 टप्प्यांसाठी ही योजना तयार केली आहे. या अंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात 21 टप्प्यांवर काम केले जाणार आहे. प्रदूषित टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून या प्रकल्पाची कार्यवाही केली जाणार आहे.

यामध्ये पवना व इंद्रायणी नदीचाही समावेश आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पिंपरी महापालिकेस दीडशे ते दोनशे कोटी रुपये मिळणार आहेत. हे काम त्वरीत सुरू देखील होवू शकते. मात्र, निविदा प्रक्रियेस किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तसेच महापालिकेला पदरमोड करावी लागेल. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी वाघेरे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.