pimpri ‘महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे’

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नागरिकांसोबत संपर्क येत आहे. त्यामुळे या विभागातील तहसिदार, नायब तहसीलदार व अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसिदार व नायब तहसिदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच महसूल आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सध्या राज्यभरात सरकारकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये महसूल खात्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत. या निमित्त त्यांचा दररोज अनेक नागरिकांसोबत संपर्क येत आहे. परिणामी त्यांना कोरोनाची बाधा होण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संवेदनशील व अधिक जोखमीचे काम करणाऱ्या आरोग्य व पोलीस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षक साहित्य पुरविण्यासह ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे.

याच धर्तीवर महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारीही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास कार्यरत आहेत. त्यामुळे महसूलमधील उपजिल्हाधिकारी, तहसिदार, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल व अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही संरक्षक साहित्य पुरवावे, तसेच ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे.

 सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थिती सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत आहेत. यामध्ये महसूल विभागाचाही समावेश आहे. त्यामुळे या विभागातील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच मिळणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा.   गणेश सोमवंशी : कार्याध्यक्ष – पुणे जिल्हा तलाठी व मंडलाधिकारी संघटना.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.