Sangvi : बेकायदेशीररीत्या विदेशी मद्य विक्री करणाऱ्याकडून 74 हजारांचे मद्य जप्त

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या कालावधीत मद्य विक्री करण्यास परवानगी नसताना एकाने बेकायदेशीररित्या मद्य विक्री केली. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्याकडून 74 हजार रुपयांची विदेशी दारू आणि बिअर दारू जप्त करण्यात आली आहे.

महादेव वैजप्पा चनाले (वय 31, रा. पिंपळे गुरव, सांगवी. मूळ रा. कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई दादा धस यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाईन शॉपी, बिअर शॉपी, देशी दारू किरकोळ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने विदेशी दारू आणि बिअरच्या 288 बॉटल आपल्याजवळ विक्री करण्यासाठी बाळगल्या.

पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी आरोपीकडून 74 हजार 185 रुपये किमतीच्या 288 बॉटल जप्त करत गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.