Pimpri : आरटीओ अधिका-यांची गांधीगिरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार

एमपीसी न्यूज – आरटीओच्या अधिका-यांनी गांधीगिरी पद्धतीने वाहतूक नियमाचे उल्लंघन करणा-या चालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. वाहतुकीचे नियम समजावून सांगत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील स्वत: रस्त्यावर उतरले होते.

11 ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह चालू आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने (आरटीओ) आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांचा गांधीगिरी पद्धतीने फुल देऊन सत्कार करण्यात आला. तीन पथकांमार्फत ही मोहीम राबविली. सकाळी निगडी येथील पवळे पुलाखाली, थरमॅक्स चौकात गांधीगिरी केली. मोटार वाहनिरीक्षक सिद्धार्थ पांढरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रसाद पवार, मोटार वाहन निरीक्षक भालचंद्र कुलकर्णी, वाहनचालक संजय चव्हाण मोहिमेत सहभागी झाले होते.

हेल्मेट न घालणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभा करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांना अधिका-यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. तसेच नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आरटीओ अधिका-यांनी सत्कार केल्याचे घरी सांगा असा निरोपही दिला. वाहतुकीचे नियम मोडणा-यांना फुल देऊन नियम समजावून सांगितले. नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

स्वत:साठी सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आपल्या चुकीमुळे कोणाला दुखापत होणार नाही. वाहतुकीला अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभा करु नयेत. मनाचा ब्रेक पाळावा. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करुन एक वेगळा आदर्श घालून द्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.