Pimpri: महापालिका 27 नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम राबविणार

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारकडून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम देशभर सुरू करण्यात आली असून पिंपरी-चिंचवड महापालिका देखील ही मोहीम राबविणार आहे. वैद्यकीय विभागाद्वारे 27 नोव्हेंबरपासून याची सुरूवात करण्यात येणार आहे. शहरातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील 6 लाख 16 हजार मुलांना ही लस देण्याचे उद्दिष्टे असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली.

यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आयुक्त आण्णा बोदडे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. चेतन खाडे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून व केंद्र शासनाच्या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार वैद्यकीय विभागाचे कर्मचारी शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन 9 महिन्यांपासून ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण करणार आहे. पाच आठवडे ही मोहीम चालणार आहे. प्रशिक्षित परिचारिकांकडून हे लसीकरण केले जाणार असून हे लसीकरण सर्वांना मोफत असणार आहे. 1200 पेक्षा अधिक संस्थांमध्ये जाऊन हे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी मुलांच्या पालकांना देखील बोलाविले जाणार आहे.

लसीकरणानंतर मुलांना सर्टिफिकेट दिले जाणार आहे. या बरोबरच विविध खासगी ठिकाणी, बांधकामाच्या ठिकाणी असणार्‍या मुलांना देखील लस दिली जाणार आहे. शहरातील 6 लाख 16 हजार विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे. यासाठी 200 मुलांना एक टीम कार्यरत राहणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना लस द्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.