Pimpri : नवरात्रीच्या नवरंगातून उन्नती सोशल फाउंडेशनने साजरा केला नवरात्र उत्सव

एमपीसी न्यूज – उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने नऊ दिवस नऊ रंगांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील महत्त्व या विषयी जनजागृती करण्यात आली, या उपक्रमाला परिसरातील नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पहिल्या दिवशी निळा रंग असल्याने लेखणीला महत्व देत, लेखणी हे विचार व्यक्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. म्हणून उन्नति सोशल फाऊंडेशन बद्दलचा आपला अनुभव व कविता, लेख पाठवाण्याचे आवाहन करण्यात आले होते. उत्कृष्ठ लेखाला व कवितेला बक्षीस देण्यात आले.

दुसऱ्या दिवशी रंग पिवळा. त्यानिमिताने आपल्या देशात सिग्नलचे महत्व वाहन चालकांना कळावे म्हणून जनजागृती करण्यात आली. रस्त्यावर रोजच होणारे अपघात हे पिवळ्या रंगाचा सिग्नल न पाळता घाई केल्यामुळे होतात. सिग्नलवरील पिवळा रंग म्हणजे संयम पाळणे होय. ‘सिग्नलवरील अति घाई संकटास नेई’ ‘चला एकजूट होऊन शपथ घेऊया…ट्रॅफिक सिग्नलचे नित्याने पालन करूया…!’ असे यावेळी वाहन चालकांना सांगण्यात आले.

तिसऱ्या दिवशीचा रंग हिरवा असल्यामुळे माणसाला 6 महिन्याचा ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल. झाडे आपल्याला मोफत ऑक्सिजन देतात म्हणून या दिवशी येथील जरवरी सोसायटीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. ‘चला तर मग, एकच लक्ष ठेऊयात वृक्षारोपण करूयात…नवनिर्मित पिंपळे सौदागर हिरवेगार करूयात… !’ अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या.

चौथ्या दिवशीचा रंग करडा. मानवाचे वाहनांवर अवलंबून असलेले रोजचे आयुष्य हे सुद्धा वायुप्रदूषणास मोठा हातभार लावत आहे. वाहनांचा वापर गरजे पुरताच करावा, सायकल किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास पर्यावरण रक्षणास मदत होईल म्हणून पिंपळे सौदागर परिसरात सायकल रॅली काढून वायू प्रदूषणाचे महत्व सांगण्यात आले.

पाचव्या दिवशी भगवा रंग असल्यामुळे या दिवशी गरजवंतांच्या उपयोगी येणे म्हणजेच मदत असते असे नाही, मदत एक मानसिक समाधान आहे. आज कुणाला तरी मदत करा आणि समाधान मिळवा असे आवाहान नागरिकांना करण्यात आले. फाऊंडेशनच्या वतीने पिंपळेगुरव येथे तारा सोफेश धडफळे सेंटर (दिव्यांग मुला-मुलींचे अनाथालय ) मुलांची शाळा आहे तेथे जाऊन त्या मुलांसोबत काही क्षण घालवले व त्या मुलांसाठी खाऊ वाटप केला, त्यांना लागणारे साहित्य, औषधे व खेळाचे साहित्य देण्यात आले.

सहाव्या दिवशी पांढरा रंग असल्यामुळे या दिवशी पांढरा रंग नेहमी आपले मन आणि बुद्धी यांवर चांगला प्रभाव करतो तसेच विचार आणि कार्यामध्ये शुद्धता आणतो. आज आपला संपूर्ण दिवस पांढरे कपडे घालवून साजरा करा असे आवाहान करण्यात आले.

सातव्या दिवशीचा रंग लाल म्हणून या दिवशी तुमच्या रक्ताचा एक थेंब, एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते. चला रक्तदान करूया माणुसकीची उंची वाढवूया…रक्तदान करा असे आवाहन करत फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 55 जणांनी रक्तदान केले

आठव्या दिवशीचा रंग आकाशी. आकाशी रंग आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. समाजामध्ये याच आत्मविश्वासाने यशाची उंची गाठलेल्या लोकांना उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने “घे भरारी” याउपक्रमाद्वारे सन्मानित करून इतरांना पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास देण्यात आला.

नवव्या आणि शेवटच्या दिवशीचा रंग होता गुलाबी. गुलाबी रंग प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक. म्हणून महिलांना सन्मानाची वागणूक द्या असे आवाहन करण्यात आले. यात आनंद हास्य योग क्लब व नवचैतन्य हास्य योग परिवार या परिवारातील सभासदांनी सहभाग घेतला.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.