Pimpri News: संध्या सूर्यवंशी ठरली ‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ची महाविजेती

महाराष्ट्रातील पाहिला रिअॅलिटी शोमुळे मिळाले अनाथाश्रमातील मुलांना व्यासपीठ

एमपीसी न्यूज – ‘केअर ऑफ यू’ या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच पिंपरी येथे पार पडली. यामध्ये संध्या सूर्यवंशी स्पर्धेची महाविजेती ठरली. ही स्पर्धा 21 ऑगस्ट रोजी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या सभागृहात “हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार” स्पर्धेचा महाअंतिम फेरीचा सोहळा रंगला. या महाअंतिम फेरीसाठी प्रशिक्षक म्हणून सुप्रसिध्द गायिaका वैशाली सामंत, सुप्रसिद्ध गायक शादाब फरिदी आणि अल्तमाश फरिदी लाभले. महाअंतिम सोहळा सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महिला व बाल विकासचे आयुक्त राहूल मोरे, केअर फॉर यु संस्थेचे सी. ए. पायल सारडा राठी, सी. ए. रोशन राठी, संतोष बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

केअर फॉर यु एनजीओ मागील 12 वर्षांपासून महाराष्ट्रातील अनाथाश्रम व वृध्दाश्रम यांच्याकरिता विविध माध्यमातून काम करीत आहे. अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद भरण्याचे हेतूने केअर ऑफ यु संस्थेने “इंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार” या महाराष्ट्रातील पहिल्या रिअॅलिटी शोची संकल्पना मांडली. ज्यामध्ये फक्त अनाथाश्रमातील मुले सहभागी होतील आणि इतर प्रसिध्द रिअॅलिटी शोप्रमाणे या अनाथ मुलांना त्यांच्यातील कलागुण जगासमोर मांडता येतील.

केअर ऑफ यु संस्थेला हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टारच्या आयोजनास पिंपरी-चिंचवड पोलीस विभाग, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज आणि सिलव्हर ग्रुप यांचे सहकार्य लाभले. जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातील 5 प्रमुख केंद्रावर या स्पर्धेच्या ऑडिशन संपन्न झाल्या. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध शहरातील अनाथाश्रमातून शेकडो मुले सहभागी झाली. पहिल्या फेरीत त्यापैकी 47 गायकांची निवड झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतुन 12 गायक महाअंतिम फेरीसाठी निवडले गेले. या 12 गायकांना ऑनलाईन माध्यमातून पाच महिने प्रशिक्षण देण्यात आले. तसेच महाअंतिम सोहळ्याच्या पाच दिवस अधिपासून महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या या मुलांची निवास, प्रशिक्षण व सरावाची व्यवस्था पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात आली होती.

अनाथ मुलांचे कलागुण जगासमोर आणण्यासाठी केअर ऑफ यु संस्था सदैव कार्यरत राहील. तसेच केअर फॉर यु संस्थेच्या स्थापनेपासून मागील बारा वर्षांत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मार्गदर्शक म्हणून महत्वपूर्ण भुमिका बजावलेली आहे, असे संस्थेच्या संस्थापिका पायल सारडा राठी यांनी सांगितले.

सोहळ्या दरम्यान कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टर्स, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते अशा 44 कोरोना वॉरीअर्सचा कृतज्ञता सन्मान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आला.

महाअंतिम सोहळ्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये सर्व गायकांनी वेगवेगळ्या थीमवर आपले गीत सादर केले. त्यातून सुपर सिक्स गायक निवडण्यात आले. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात अहमदनगरच्या अनाम प्रेम संस्थेची दिव्यांग मुलगी संध्या सुर्यवंशी महाविजेती ठरली. अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेची साक्षी नरवडे, व्दितीय आणि पुण्याच्या मावळ मधील संपर्क बालग्राम संस्थेची चैताली साक्रीकर तृतिय विजेत्या ठरल्या. महाअंतिम सोहळ्याचे 12 महागायक, 3 महाविजेते आणि ज्या संस्थेमधून जे गायक आले होते त्या 12 संस्थांना बक्षीस तसेच मदत स्वरुपात जवळपास दीड लाखांची रक्कम देण्यात आली. तसेच या महाविजेत्यांच्या संगीत व पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी केअर ऑफ यु संस्थेने घेतली आहे.

परिस्थितीवर मात करत संगीताप्रती असलेले आपले प्रेम जपणाऱ्या या मुलांचे वैशाली सामंत, शादाब फरिदी अल्तमास फरिदी आणि अवधूत गुप्ते यांनी कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली आहे. कार्यक्रम पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुंभार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.