Pimpri: … तर पक्षविरोधी कारवाईला सामोरे जाणार – शीतल शिंदे

एमपीसी न्यूज – मी दुस-यांदा नगरसेवक असून यापूर्वीही स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक होतो. त्यावेळीही मला डावलले. तर, विलास मडिगेरी प्रथमच निवडून आले असून त्यांचा स्थायीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तरीही, त्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत आहे. माझ्यामागे पक्षाचे 30 ते 40 नगरसेवक आहेत. त्यामुळे मी बंडखोरी करून अर्ज भरल्याचे भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच पक्षाने कारवाई केल्यास त्याला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, उत्तम केंदळे, भाजप सरचिटणीस प्रमोद निसळ, अनुप मोरे, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांच्यासह विरोधी पक्षातील नगरसेवक उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मयूर कलाटे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. तर, भाजपच्या शीतल शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीच्या गीता मंचरकर यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. कलाटे आणि शिंदे या दोघांपैकी एकाचा उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यात येईल. शीतल शिंदे किंवा मयूर कलाटे या दोघांपैकीच एकजण स्थायी समितीचा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे”

महापौर राहुल जाधव म्हणाले, “आम्ही भोसरीगावातील संतोष लोंढे यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे यासाठी आग्रही होतो. परंतु, पक्षाने दुस-या नगरसेवकाला संधी दिली. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि विलास मडिगेरी जरी भोसरी मतदार संघातील असले तरी त्यांच्यावर ‘शिक्का’ वेगळा आहे. त्यामुळे तीनही वेळेस स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरीतील नगरसेवकाला डावलण्यात आले आहे. आता पुढील भूमिका आमदार महेश लांडगे सांगतील. त्यानुसार घेतली जाईल ” बंडखोरी झाली असली तरी भाजपचाच अध्यक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.