Pimpri : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे विलास मडिगेरी यांना उमेदवारी, शीतल शिंदे यांची बंडखोरी

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मयूर कलाटे रिंगणात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. भाजपतर्फे विलास मडिगेरी यांचा अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर, भाजपच्या शीतल शिंदे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मयूर कलाटे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीत काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजप पक्षश्रेष्ठीला बंडखोरी शमविण्यात यश येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपतर्फे विलास मडिगेरी यांनी आज (शनिवारी) उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासमवेत महापौर राहुल जाधव, सभागृनेते एकनाथ पवार, झामाबाई बारणे उपस्थित होते. विलास मडिगेरी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून राजेंद्र गावडे तर अनुमोदक म्हणून आरती चोंधे यांच्या स्वाक्ष-या आहेत. तर दुस-या अर्जावर सूचक म्हणून सागर अंगोळकर आणि अनुमोदक म्हणून करुणा चिंचवडे यांनी स्वाक्ष-या केल्या आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी दुस-यांदा डावलल्याने भाजपच्या शीतल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शीतल शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे तर अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीच्या गीता मंचरकर यांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांच्यासह भाजपचे काही नगरसेवक देखील उपस्थित होते.

दुसरीकडे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून पंकज भालेकर तर अनुमोदक म्हणून प्रज्ञा खानोलकर यांनी स्वाक्ष-या केल्या. भाजपमध्ये बंडखोरी झाल्यामुळे आणि राष्ट्रवादीने रिंगणात उमेदवार उतरवल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी स्व:तचा उमेदवार ठेवणार की भाजपच्या बंडखोराला मदत करुन चमत्कार घडविणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाची प्रत्यक्ष निवडणूक गुरुवारी (दि.7) दुपारी बारा वाजता होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे हे कामकाज पाहणार आहेत. स्थायी समितीत दहा भाजप, चार राष्ट्रवादी काँग्रेस, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. परंतु, भाजपच्या भोसरी गटातील नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतल्यास शीतल शिंदे यांचे पारडे जड मानले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.