Pimpri : ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’चा प्रस्ताव ‘स्थायी’ने फेटाळला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फे शहर परिवर्तन कार्यालयांतर्गत सिटीझन एन्गेजमेंट कार्यक्रम आणि सोशल मिडीया कॅम्पेन राबविण्याचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ची नेमणूक करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला आहे. अमोल देशपांडे यांची ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ म्हणून नेमणूक केली जाणार होती. त्यामोबदल्यात त्यांना दरहमहा 70 हजार रुपये मोजले जाणार होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची साप्ताहिक सभा 28 फेब्रुवारीला पार पडली. सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विषयपत्रिकेवरील 6 व्या क्रमांकावरील ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’चा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या विविध प्रकल्पांच्या कामकाजांसाठी शहर परिवर्तन कार्यालय (सिटी ट्रान्फॉर्मेशन ऑफीस तथा सीटीओ) स्थापन करण्यात आली आहे. या कार्यालयामार्फत विविध माध्यमांचा उपयोग करून सिटीझन एन्गेजमेंट कार्यक्रम आणि सोशल मिडीया कॅम्पेन राबविण्यात येणार आहे. शहराच्या विकासात नागरीकांना अंतर्भूत करून घेणे, नागरिकांची, तज्ज्ञांची मते जाणून घेवून सर्वेक्षण करणे आदी कामांचा समावेश आहे. त्यासाठी सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे.

हे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘सोशल मिडीया एक्स्पर्ट’ म्हणून अमोल देशपांडे यांची नेमणूक करण्यात येणार होती. सुरूवातीच्या सहा महिने कालावधीसाठी ही नेमणूक असणार होती. दरमहा सत्तर हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार होते. परंतु, स्थायी समितीने हा प्रस्ताव फेटाळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.