Pimpri : श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद; चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील चार वर्षात श्‍वान नसबंदीवर कोट्यावधी रुपये खर्च केले असताना शहरात श्‍वानांची संख्या वाढत आहे. श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद असून याची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने शहरातील श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. कुत्री पकडून नेहरुनगर येथील गुलाबपुष्प उद्यानाशेजारच्या डॉग शेल्टरमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे श्‍वान आणलेल्या ठिकाणी सोडले जातात. एका श्‍वानावर शस्त्रक्रियेसाठी 693 रुपये खर्च येतो. सन 2015-16 या वर्षात एकूण 15 हजार 808 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली गेली. त्यासाठी एकूण 1 कोटी 9 लाख 55 हजार 523 रुपये खर्च झाला. सन 2016-17 या वर्षात 14 हजार 907 मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली गेली. त्याकरिता पालिकेने 1 कोटी 3 लाख 30 हजार 916 रुपये खर्च केले.

सन 2018-19 या चालू वर्षात पालिकेने आतापर्यंत 15 हजार 160 मोकाट कुत्री पकडली. त्यापैकी 14 हजार 160 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली गेली. एकूण 253 जखमी, आजारी व पूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया न करता सोडून देण्यात आले. त्यासाठी आतापर्यंत एकूण 1 कोटी 3 लाख 30 हजार 557 इतका खर्च झाला आहे. असा गेल्या 4 वर्षांत आतापर्यंत एकूण 58 हजार 203 कुत्र्यांवर तब्बल 4 कोटी 3 लाख 305 हजार रुपये इतका खर्च झाला आहे.

मागील चार वर्षात इतकी रक्कम खर्च करुनही शहरात मोकाट व भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण देण्याऐवजी त्यांची संख्या आहे तशीच किंवा वाढलेली दिसते. त्यामुळे या कामावर झालेला 4 कोटी 3 लाख 305 हजार रुपये ही रक्कम प्रत्यक्षात खर्च झाली की, कागदोपत्री रंगविण्यात आली हे संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन यामध्ये काही गैरप्रकार असेल तर संबंधित दोषींवर कारवाई करावी. तसेच शहरात मोकाट व भटक्‍या कुत्र्यांचा व डुकरांचा उपद्रव नागरिकांना कमी व्हावा. यासाठी केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी देखील कुत्री पकडण्याची प्रभावी मोहीम आखून नागरिकांना होणारा हा उपद्रव नियंत्रणात आणावा, अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.