Pimpri : पिंपरी पोलिसांची आठ दिवसातील तडीपारीची तिसरी कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी मागील आठ दिवसात तीन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. गुरुवारी (दि. 17) तिसऱ्या आरोपीला तडीपार करण्यात आले. यामुळे शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.

सुरेश उर्फ काळ्या अर्जुन बोचकुरे (वय 24, रा. गांधीनगर, पिंपरी) असे तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश हा पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारामारी, वाहनांची तोडफोड आणि परिसरात दहशत पसरविण्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी दिवसेंदिवस परिसरात वाढत शल्याने त्याच्यावर पिंपरी पोलिसांनी ही कारवाई करत दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पिंपरी पोलिसांची मागील आठ दिवसातील तडीपारीची ही तिसरी कारवाई आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस शिपाई सुहास डंगारे, गणेश कर्पे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.