Pimpri : रस्ते खोदाईच्या कामातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज  –  पिंपरी – चिंचवड शहरातील खासगी केबल नेटवर्कच्या रस्ते खोदाईच्या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या गैरव्यवहाराची राज्य गुन्हे अन्वेषन विभागा मार्फत (सीआयडी) चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच या कामाची प्रत्येक्ष जागेवर जाऊन  ‘आयआयटी’ सारख्या त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक तपासणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने एका खासगी टेलिकॉम कंपनीस शहरातील सुमारे 355 किलोमीटर अंतर भूमिगत फायबर केबल नेटवर्कसाठी रस्ते खोदकामास परवानगी दिली आहे. शहरातील विविध भागात भूमिगत केबल नेटवर्कसाठी रस्ते खोदकामत संबंधित कंपनीस पावसाळा वगळून एकूण 120 दिवसांच्या मुदतीवर अटी व शर्तीवर मार्च 2018 ला परवानगी दिली. ती मुदत बुधवारी (दि.19) संपली आहे. शासनाच्या अटी आणि शर्तीचे सर्रासपणे उल्लघंन करुन त्यापेक्षा अधिक अंतराचे काम कंपनीने केले आहे.

या कामाच्या बदल्यात कंपनीने महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालय, रुग्णालय, मोफत इंटरनेट देण्याची शासनाची अट आहे. मात्र, तशी सुविधा अद्याप दिली गेलेली नाही. उलट, पालिका वर्षाला लाखो रुपये खर्च करुन इंटरनेट खरेदी करीत आहे. किमान एक मीटर खोलीवर केबल टाकण्याची अट असतानाही अर्ध्या फुटावरच पदपथाऐवजी डांबरी रस्ते फोडून हे काम केले गेले आहे. त्यामुळे पालिकेचे नुकसान झाले आहे. या कामासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत तसेच एमएनजीएल,  महावितरण आदी विभागांची एनओसी सक्तीची असतानाही त्या परवानग्या घेतल्या गेल्या नाहीत. सांगवी परिसरात डकचा वापर न करता थेट कॉक्रिटचे रस्ते फोडून केबल टाकले गेले आहेत.

सरकारचे नियम पायदळी तुडवून कंपनीने शहरात खोदकाम केले. महापालिकेस मोफत इंटरनेट सुविधा देखील दिली नाही. त्यामुळे या प्रकरणी आयुक्तांसह संबंधित अधिका-यांची तसेच या कामात सहभागी असणा-या लोकप्रतीनिधींची राज्य गुन्हे अन्वेषन विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्याची मागणी भापकर यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.