Pimpri : यंदा आपल्या घरी हवेत, शाडू मातीचेच बाप्पा !

एमपीसी न्यूज- बाप्पांच्या आगमनाला अवघे दोन दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे शहरामध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी गणेशमूर्ती आणण्याची लगबग सुरु आहे. चौकाचौकांमध्ये सर्वांग सुंदर, वेगवेगळ्या रूपातील, विविध आकारातील गणेश मूर्तींचे स्टॉल भाविकांना आकर्षित करीत आहेत. पण मित्रानो, या सर्व मूर्ती शाडू मातीपासून तयार केल्या आहेत का हो ? आपण नजरचुकीने प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती तर घरी आणत नाही आहोत ना ? शाडूची मूर्ती कशी ओळखावी ? प्लास्टर ऑफ पॅरिस का नको ? घरात आपल्या स्वतःच्या हाताने शाडू मूर्ती का आणि कशी घडवावी या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी एमपीसी न्यूजच्या प्रतिनिधीने धोंडफळे कला निकेतनचे संचालक सुप्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे यांच्याशी संवाद साधला.

रास्ता पेठेत १९४० मध्ये स्थापन झालेल्या धोंडफळे कला निकेतन या स्टुडिओमध्ये आज ८० वर्षे झाली पण एकही मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवण्यात आलेली नाही. शाडूची माती वापरून केलेल्या मूर्ती किंवा कागदाच्या पल्प पासून तयार केलेल्या गणपतीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. अभिजित धोंडफळे यांचे बाबा हे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पूर्णपणे विरोधात होते. ते आपल्या स्टुडिओमध्ये शाडू मातीमधूनच गणेश मूर्ती तयार करीत असत. याबाबत माहिती देताना अभिजित धोंडफळे सांगतात की, ‘शाळेत असताना मला माझे बाबा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी संभाजी पुलावर घेऊन जात आणि तिथले दृश्य दाखवत. ज्या गणपती बाप्पाची दहा दिवस मनोभावे पूजा करून ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त विनवणी करीत त्याला साश्रू नयनाने निरोप देण्यात येतो. त्याच गणपतीचे नदीकिनाऱ्यावर इतस्ततः विखुरलेले भंगलेले अंग पाहून खूप वाईट वाटत असे. ही झाली भावनिक बाब ! पण आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरून पर्यावरणाची किती नासाडी करत आहोत हे कुणाच्याच लक्षात येत नाही याचे खूप दुःख होत असे’.

पण फक्त धोंडफळे कला निकेतनमध्ये शाडूची मूर्ती तयार करून काय उपयोग ? शाडूच्या मातीचे महत्व लोकांना देखील समजले पाहिजे, त्यांना देखील घरच्या घरी मूर्ती बनवता आली पाहिजे आणि हा संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचून जलप्रदूषणाला आळा बसावा या उद्देशाने अभिजित धोंडफळे यांनी शाळा महाविद्यालयातून शाडूची गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. थोडक्यात एक चळवळच सुरु केली म्हणा ना ! कारण येणाऱ्या पिढीला आजच या गोष्टीचे महत्व कळावे, जेणेकरून पुढे जाऊन हा संदेश घराघरात पोहोचेल.

मागील वीस वर्षांपासून अभिजित धोंडफळे हे शाडूमातीच्या गणेश मूर्तीची कार्यशाळा घेत आहेत. २०१७ मध्ये धोंडफळे यांनी घेतलेल्या कार्यशाळेमध्ये पुण्याच्या रमणबाग शाळेमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झाले. ज्यामध्ये २१६१ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी शाडूच्या गणेश मूर्ती बनवल्या आणि त्यांनी या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना केली. धोंडफळे यांनी पुणे, मुंबईसह देशातील अनेक शहरांमधून या कार्यशाळा घेऊन लोकांना त्याचे महत्व पटवून दिले आहे. एवढेच काय धोंडफळे यांनी भारतीय सैनिकांच्या सोबत कार्यशाळा घेऊन शाडूच्या मूर्तीचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे. आज लोकांमध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे महत्व समजले आहे याचा त्यांना खूप आनंद आणि समाधान वाटते.

प्लास्टर ऑफ पॅरिस का नको हे सांगत असताना अभिजित धोंडफळे म्हणाले, ” प्लास्टर हे जिप्सम नावाचे खनिज आहे. त्याला ३२० डिग्री पर्यंत तापवले जाते. नंतर ते थंड झाले की त्याची पावडर केली जाते. जेंव्हा या पावडरचा संपर्क पाण्याशी येतो, त्यावेळी रासायनिक प्रक्रिया घडून ते अविघटनशील होते. ते पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजे विचार करा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या लाखो गणेशमूर्ती ज्यावेळी पाण्यात विसर्जित केल्या जातात त्यावेळी किती मोठ्या प्रमाणात पाण्यातील जैवविविधतेवर आणि एकूणच पर्यावरणावर घाला घातला जातो याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच फक्त आणि फक्त शाडूच्या मातीपासूनच गणपती तयार केलेला असावा ही काळाची गरज बनलेली आहे ”

धोंडफळे पुढे म्हणाले, ” कार्यशाळा घेण्याचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे, बाजारातून विकत घेऊन शाडूची मूर्ती आणण्यापेक्षा आपल्या हाताने ती घडवण्यात वेगळा आनंद दडलेला असतो. मग ती थोडीशी ओबडधोबड असली म्हणून काय झाले ? त्यामध्ये आत्मिक आनंद लपलेला आहे, त्याची बरोबरी बाजारातील मूर्ती कशी करू शकेल ? म्हणूनच प्रत्येकाने वेळात वेळ काढून घरामध्ये स्वतःच्या हाताने बाप्पांची मूर्ती करावी आणि तिची प्रतिष्ठापना करून अखेरच्या दिवशी घरातच तिचे विसर्जन करावे. जेणेकरून पुढील वर्षी त्याच मातीमधून पुन्हा गणेश मूर्ती बनवता येईल. म्हणजे पाणी प्रदूषित होणार नाही आणि मातीची नासाडी देखील वाचेल. शाडूच्या मातीच्या खाणी गुजरातमध्ये आहेत. तेथून ही माती आणून त्याची मूर्ती केली जाते. त्यामुळे मातीचा पुनर्वापर केला तर खनिजसंपत्तीचे संरक्षण देखील घडेल”

“2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये अभिजित धोंडफळे यांच्या नावासहित उल्लेख करून धोंडफळे करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. नुकत्याच स्वातंत्र्य दिन सोहळ्यात झालेल्या भाषणात पंतप्रधानांनी वॉटर कॅझर्व्हशनचा मुद्दा मांडून त्यांचे महत्व सांगितले होते. त्यामुळे पुणेकरांनी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बसवून त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे ” असे धडफळे म्हणाले.

आता प्रश्न असा पडतो, की बाजारात गेल्यानंतर शाडूची मूर्ती कशी ओळखावी ? याचे स्पष्टीकरण देताना अभिजित धोंडफळे म्हणाले, ” प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूच्या गणेश मूर्तीमध्ये महत्वाचा फरक म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती शाडू पेक्षा वजनाला हलकी असते शिवाय ती आतल्या बाजूने पांढरी आणि प्लेन असते. मात्र शाडूची मूर्ती उलटी करून पहिली असता आतल्या बाजूने बोटाने थापल्यासारखी दिसते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे फिनिशिंग अगदी गुळगुळीत असते. शाडूच्या मूर्तीचे रंग मॅट फिनिशचे असतात तर तर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती भडक चकचकीत रंगाची दिसते. त्यामुळे प्रत्येकाने बाजारातून मूर्ती आणताना या गोष्टींची खात्री करून खात्रीच्या ठिकाणाहूनच मूर्ती खरेदी केली पाहिजे ”

मध्यंतरी काही लोकांनी प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळू शकते असे सांगत त्यासाठी एक पावडर पाण्यात टाकून त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती विसर्जित केली की ती विरघळून जाते असा दावा केला होता. अभिजित धोंडफळे यांनी यांनी हा दावा खोडून काढत प्लास्टर ऑफ पॅरिस कधीच पाण्यात विरघळत नाही हे ठामपणे सांगितले.

अभिजित धोंडफळे यांची आणखी एक ओळख म्हणजे पुण्यात माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा पुतळा तसेच सदर्न कमांड चौकात उभा असलेला फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा पूर्णाकृती पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरात महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या जीवनावर आधारित तयार केलेले म्युरल्स अभिजित धोंडफळे यांच्या हातातूनच घडलेले आहे.

तेंव्हा, मित्रानो यंदा आपल्या घरी शाडू मातीचे बाप्पाच घेऊन या ! पर्यावरणाचे रक्षण करू आणि बाप्पांची विटंबना टाळू अशीच शपथ घेऊ !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.