Pimpri : ‘जनता कर्फ्यू’मुळे पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर शुकशुकाट!

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आज (रविवार) पाळण्यात येत असलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला पिंपरी-चिंचवडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वयंस्फूर्त संचारबंदीमुळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट अनुभवायला मिळत आहे.

मॉर्निंग वॉकला येणाऱ्या हजारो नागरिकांमुळे सकाळी गजबजणाऱ्या निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर देखील आज पहाटे लवकर गर्दी झाली. पहाटे लवकर मॉर्निंग वॉक व व्यायाम करून सातच्या आत घरी परत जाण्यास नागरिकांनी पसंती दिली तर काहीजणांनी आज मॉर्निंग वॉकला सुट्टी घेतली. दुध वितरक आणि वृत्तपत्र विक्रेत्यांनी सकाळी सातपूर्वी ग्राहकांच्या घरी दूध व वृत्तपत्रे पोहचविण्याची व्यवस्था केली होती.  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कंपन्या, उद्योग, व्यवसाय, दुकाने बंद असल्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या कामगारांची लगबग व गर्दी कोठेही दिसत नाहीय. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. रिक्षा व टॅक्सी देखील पाहायला मिळत नाहीय.

चौकाचौकांमध्ये पोलीस कर्मचारी पाहायला मिळत असून खासगी दुचाकी किंवा खासगी मोटारींची अत्यंत तुरळक वाहतूक पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे तपासून सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटाची पुरेशी जाणीव झाली असल्यामुळे नागरिकांकडून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वजण आपापल्या घरी किंवा आहे त्या ठिकाणी थांबल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे पोलिसांनाही नागरिकांना घरी पिटाळण्याचे काम उरले नसल्याचे पाहायला मिळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.