Pimpri vaccination News : लशींच्या तुडवड्याने केंद्रांवर वादावादीचे प्रकार, आदल्यादिवशी टोकन देणे ठरेल योग्य

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे प्रशासन आणि नागरिकांना विविध अडचणींना, समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लसीकरणासाठी पहाटेपासूनच केंद्रांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. एका केंद्रांवर केवळ 100 लशींचे डोस उपलब्ध असतात. रांगेत थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिक संतप्त होतात अन् अनेकदा वादावादीचे प्रकार घडतात. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांनाही पाचारण करावे लागते. त्यासाठी यमुनानगर केंद्रांवर आदल्यादिवशीच टोकन देण्याची पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे जेवढे टोकन मिळालेत तेवढेच नागरिक रांगेत थांबतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वंच केंद्रांवर ही पद्धत अवंलबण्याची आवश्यकता आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून दुस-यादविशी कोणत्या केंद्रांवर कोणती आणि किती क्षमतेने लस मिळणार याची माहिती आदल्यादिवशी प्रसिद्ध केली जाते. नागरिकांना रांगेत ताटकळत थांबावे लागू नये यासाठी यमुनानगरमधील लसीकरण केंद्रांवर एक चांगला पर्याय काढला आहे. आदल्यादिवशीच सायंकाळी पाच वाजता नागरिकांना टोकन दिले जाते.

ज्या नागरिकांना टोकन मिळाले. तेवढेच नागरिक दुस-यादिवशी रांगेत थांबतात. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतोय आणि लसही मिळत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सर्वच केंद्रांवर ही पद्धत अंवलबण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन गोंधळ होणार नाही. नागरिकांना पहाटेपासून रांगेत थांबावे लागणार नाही.

”महापालिकेकडून दुस-यादिवशीच्या लसीकरणाची माहिती आदल्यादिवशी दिली जाते. त्याबाबतची माहिती आम्ही नागरिकांना देतो. जेवढे डोस आहेत. तेवढेच टोकन आदल्यादिवशी सायंकाळी नागरिकांना देतो. त्यानुसार दुस-यादिवशी तेवढेच नागरिक लसीकरणासाठी येतात. त्यांना रांगेत न थांबता लस दिली जाते. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतो. विनाकारण गर्दी होत नाही. हा उपक्रम संपूर्ण शहरात राबविण्यात यावा”, असे यमुनानगरचे नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले.

ऑनलाइनमुळे शहराबाहेरील लोक शहरात लसीकरणासाठी येत आहेत. स्थानिकांना लस मिळत नाही. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे ऑन द स्पॉट लसीकरण करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

महापालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. वर्षा डांगे म्हणाल्या, ”लसीकरण केंद्रांवर गोंधळ होऊ नये यासाठी आदल्यादिवशी टोकन देण्याचा पर्याय चांगला आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर आदल्यादिवशी टोकन देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.