Pimpri : राष्ट्रवादीच्या बैठकीकडे माजी आमदार विलास लांडे यांनी फिरविली पाठ, चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांची पुण्यात बैठक झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलविलेल्या बैठकीकडे निरोप देऊनही भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आज दुपारपासून लागू झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत अजित पवार यांनी बैठक घेतली.

या बैठकीचा निरोप भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना देखील दिला होता. परंतु, निरोप देऊनही या बैठकीकडे लांडे यांनी पाठ फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीलाही लांडे यांनी गैरहजेरी लावली होती. त्यानंतर आता बैठकीकडेही लांडे यांनी पाठ फिरविल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून विलास लांडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आज राष्ट्रवादीच्या बैठकीकडे लांडे यांनी पाठ फिरविल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. लांडे घड्याळाची साथ सोडतात काय? या चर्चेने  जोर धरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.