Pimpri: अजितदादांनी घेतला आढावा, इच्छुकांसोबत पाच तास चर्चा

काळेवाडीतून राष्ट्रवादी उद्या फोडणार प्रचाराचा नारळ

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांसोबत सुमारे पाच तास चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. दरम्यान, राष्ट्रवादीचा उद्या (रविवारी) काळेवाडीत मेळावा होणार असून या मेळाव्यातून प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आज दुपारपासून लागू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. प्रत्येकाशी वन-टू-वन चर्चा केली. सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली बैठक सुमारे पाच तास चालली. शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवाव्यात, अशी मागणी यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार अण्णा बनसोडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, राजेंद्र जगताप, पंडीत गवळी, पक्षाचे प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचा उद्या काळेवाडीत मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या (रविवारी) मेळावा होणार आहे. काळेवाडी येथील बालाजी मंगल कार्यालयात चार वाजता हा मेळावा होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.