PM Modi Pune Live : पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान; तर धनादेशाचे मोदींकडून नमामी ‘गंगे’ उपक्रमाला समर्पण

एमपीसी न्यूज : PM Modi Pune Live (1 ऑगस्ट):  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीत फुट पाडल्यानंतर आज शरद पवार आणि नरेंद्र मोदी तसेच अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर असणार आहेत. यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे. आज 11:45 वाजता हा सोहळा सुरू होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

ज्या सोहळ्याची गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती, तो क्षण अखेर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक संस्थानचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी त्यांना टिळक पगडी, स्मरणचिन्ह, केसरीचा पहिला अंक, भगवद्गीता आणि टिळकांची मूर्ती असलेले सुंदर असे मानचिन्ह आणि एक लाखाचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. तर यावेळी हा एक लाखांचा धानदेश त्यांनी नमामी गंगे उपक्रमाला प्रदान केला.


12.00 वाजता : लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला प्रारंभ 

लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाला सुरुवात झाली असून व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अध्यक्ष दीपक टिळक उपस्थित आहेत.

तर, लोकमान्य टिळक यांच्या मूर्तीला माळ अर्पण करून आणि टिळक लिखित भगवद्गीता मोदी यांना प्रदान करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे.


11.48 वाजता : पुरस्कार सोहळ्याला शरद पवारांची प्रथम हजेरी 

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पोहोचलेल्या मान्यवरांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पहिले मान्यवर आहेत. एकीकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मोदी यांना विरोध असताना दुसरीकडे मात्र शरद पवार यांनी कार्यक्रमाला पहिली हजेरी लावली आहे. नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असणार आहे तर कार्यक्रमासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत.


 

11.38 वाजता : मोदी यांच्या हस्ते अभिषेकाला प्रारंभ 

पंतप्रधान मोदी हे दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात पोहचले असून त्यांच्या हस्ते गणेशाच्या अभिषेकाला प्रारंभ झाला आहे. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत.


11. 07 वाजता : मोदी पुण्यात हजर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात पोहोचले असून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील तसेच श्रीरंग बारणे यांनी त्यांचे स्वागत केले.

दगडूशेठ मंदिरापासून त्यांच्या पुण्यातील कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.   (PM Modi Pune)

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासोबतच पिंपरी-चिंचवड ते पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद बनवणाऱ्या नवीन मेट्रो रेल्वे लाईनच्या विस्ताराचे उद्घाटनही ते करणार आहेत.


10.43 वाजता : विरोधक अजूनही विरोधावर ठाम 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉँग्रेसमध्ये नेते असलेल्या टिळक घराण्यातूनच पुरस्कार दिला जाणार असला तरीही यावर राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे नेते समाधानी नसून त्यांनी अजूनही मोदींविरोधी विरोध सुरूच ठेवला आहे.

मणिपूर येथे घडलेल्या महिलांवरील घटनेवर मोदी यांनी मौन बाळगले असल्याने त्यांचा विरोध केला जात आहे. मोदी पुण्यात दाखल झाले असूनही विरोधक मात्र निषेधावर ठाम आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.