PMRDA News : विकास आराखड्यावर हरकतींसाठी मुदतवाढ द्या, खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)ने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप विकास आराखड्यावरील हरकतींसाठी अंतिम मुदत 30 ऑगस्टपर्यंत आहे. आराखड्याबाबत शेतकरी, नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे आराखड्यावरील हरकतींसाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्राच्या विकास योजनेचा प्रारुप आराखडा 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या आराखड्याबाबत हरकती व सूचना घेण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, पीएमआरडीए क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत.

या हरकती घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे हरकतींसाठी शेतकरी व नागरिकांची मुदतवाढ देण्यासाठी मागणी आहे. त्यामुळे प्रारुप आराखड्यावर हरकती घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.