Pune – वटपौर्णिमेदिवशी दागिने चोरणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या पुजेसाठी नटून-थटून निघालेल्या 14 महिलांच्या  गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळवणा-या दोन चोरटयांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी (दि.27 जून) सकाळी 8 ते दुपारी 4च्या दरम्यान या 14 चो-या झालेल्या होत्या.

मुज्जमिल माजीद खान ( वय 24,रा.गंजपेठ, पुणे) व मोसीन अब्बास शेख (वय 30, रा.गंजपेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वटपौर्णिमेच्या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एका पाठोपाठ एक अशा तब्बल 14 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या.महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे फरार झाले होते. एवढेच नाहीतर पोलिस कर्मचा-यांना धक्के देऊन ते पळून गेले होते.

या चोरीच्या अगोदर त्या दोघांनी एक दूचाकी चोरी केली होती. त्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दूचाकी चोरीच्या तपासादरम्यान त्या दोघांना पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता वटपौर्णिमेच्या दिवशी दागिने चोरणारे सराईत तेच दोघे असल्याचे उघडकीस आले. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली सोनसाखळी चोरी करताना वापरण्यात आलेल्या दुचाकीचा क्रमांक सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता.

वटपौर्णिमेच्या दिवशी केलेल्या 14 चो-यांची त्यांनी कबुली दिली. चोरीच्या दागिन्यांचे एकमेकांत वाटप करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याने ते दागिने विकले नव्हते त्यामुळे चोरीचे शंभर टक्के दागिने पोलिसांनी चोरटयांकडून हस्तगत केले आहेत. यापुर्वी मुज्जमिलवर 8 तर मोसीनवर 4 गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलिस उप आयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे,सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलीस कर्मचारी विनोद जाधव, प्रमोद नेवसे,संदिप कांबळे, समीर माळवदकर, राकेश क्षीरसागर, इम्रान नदाफ, हिंमत होळकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.