Pimpri : ‘पाणी अडवा अन्‌ नगरसेवकांची जिरवा; प्रशासनाची नवीन मोहीम’

भाजप नगरसेवक तुषार कामठे यांची उपरोधिकपणे टीका 

प्रभारी अतिरिक्त आयुक्तांकडील विभाग कमी करा 

एमपीसी न्यूज – पवना धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा केला जात नाही. पाणी अडवा अन्‌ नगरसेवकांची जिरवा अशी नवीन मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे त्यांचा गौरव केला पाहिजे, अशी उपरोधिक टीका भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली. तसेच प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे 22 ते 23 विभाग दिले आहेत. कोणत्या विभागात काय चालले आहे हे त्यांना माहीत नसते. त्यामुळे त्यांच्याकडील काही विभाग काढून घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

ऑगस्ट महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) झाली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेत बोलताना भाजपचे नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, पाच सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत साजरा केला गेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. डोन डझन विभागासह शिक्षण विभाग देखील अष्टीकरांच्या अधिपत्याखाली येतो. शिक्षक दिनाची त्यांना माहिती देखील नव्हती. शिक्षक दिनाचा कार्यक्रम सोडून ते स्थायी समितीच्या बैठकीला आले. शिक्षक दिनापेक्षा स्थायी समितीची सभा महत्वाची आहे का?, त्यांच्याकडे एवढे विभाग आहेत की कुठल्या विभागात काय चालले आहे, हेच माहित नसते.

एका अधिका-यांकडे दोन विभाग आणि अष्टीकर यांच्याकडे 50 विभाग हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे अष्टीकर यांच्याकडील काही विभाग कमी करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच प्रभागात स्वच्छता केली जात नाही, घंटागाडी येत नाही. अधिकारी केवळ ठेकेदारांसोबत फिरण्यात दंग आहेत. शहरविकासाबात अधिका-यांचे काहीच नियोजन नाही. शहरासाठी चांगल्या योजना आणल्या आहेत. अधिकारी तीन वर्षानंतर बदलून जातील. परंतु, आम्हाला शहरातील जनतेला उत्तरे द्यायची आहेत. आम्ही  काय उत्तरे द्यायची? असा सवाल उपस्थित करत यामुळे पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याची खंत वाटत असल्याचेही, कामठे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.