Pimpri : चौकीतच पोलिसाला गोळया घालून जीवे मारण्याची धमकी; त्रिकुट’ ठोकल्या बेड्या 

एमपीसी न्यूज – सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे-सौदागर पोलीस चौकीत एका त्रिकुटाने पोलीस हवालदाराच्याच कानशिलात लगावली. एवढेच नाही तर भर चौकीतच पोलिसाला गोळया घालून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी तिघांना सांगवी पोलिसांनी गजाआड केले आहे. 

अनिल गोरख दळवी (वय 30) अविनाश गोरख दळवी (वय 25, दोघे रा. रोज लॅण्ड रेसिडेन्सी, पिंपळे-सौदागर) या सख्ख्या भावांसह प्रकाश शिवदास कडभने (वय-23, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. पोलीस हवालदार सुनील सखाराम बोकड (वय 43) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपळे-सौदागर येथे कुणाल आयकॉन रस्त्यावरील एका  पान स्टॉल येथे श्रीधर धुंडप्पा कडते यांना दुकानासमोर सिगारेट पिऊ नकोस, असे म्हणत आरोपींनी लाकडी दांडके, सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली.

या मारहाण प्रकरणी तक्रार देण्यासाठी कडते हे त्यांच्या बहिणीसमवेत पिंपळे-सौदागर पोलीस चौकीत आले. आरोपीही चौकीत आले. यावेळी चौकीत उपस्थित असलेले चौकी अंमलदार पोलीस हवालदार बोकड हे एका गळफास प्रकरणाची माहिती घेत होते. बीट मार्शल मारहाण प्रकरणाची माहिती बोकड यांना देत असताना आरोपी दळवी बंधूसह तिघांनी चौकीत आरडाओरडा सुरू केला. तसेच चौकीबाहेर जाऊन पोस्टरचे पाईप काढला आणि पाईप घेऊन चौकीत आले.

चौकीच्या दरवाजावर आणि टेबलावर पाईप मारत काच फोडली. एवढ्यावरच न थांबता हवालदार बोकड यांच्या शर्टची कॉलर पकडत कानफटात लगावली. तसेच गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना पोलिसांनी गजाआड केले. फौजदार महेंद्र आहेर तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.