Chakan : पेट्रोल पंपावरील दरोड्याचा प्रयत्न फसला 

चाकण एमआयडीसीतील निघोजे येथील घटना; तिघे जेरबंद ; दोघे फरार 

रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांची कारवाई  (अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज – गस्तीवरील पोलिसांना पाहून पळणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले असता संबंधित तिघे चाकण एमआयडीसीमधील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चाकण एमआयडीसीमध्ये निघोजे (ता. खेड) गावचे हद्दीत एचपी पेट्रोल पंपाजवळ गस्तीवरील पोलिसांनी संबंधित तिघे जेरबंद केले असून त्याचे अन्य दोघे साथीदार मात्र फरारी झाल्याची घटना शनिवारी (दि.१) पहाटे तीनचे सुमारास घडली.

संदीप बाळासाहेब खैरनार (रा. निगडी, ओटा स्कीम, त्रिवेणी चौक, पुणे), अर्णव राजाराम शिंदे (रा. तळवडे चौक, पुणे), अक्षय रमेश जाधव (रा. निगडी पीएमसी बस स्टँड मागे, स्मशानभूमीचे समोर , निगडी, पुणे)  अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे असून मोटारसायकलवरील दोन अज्ञात इसम (नाव पत्ता निष्पन्न नाही) पसार झाले आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार डी. एस. जाधव यांनी या बाबत फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून वरील सर्वांवर भा.दं.वि. कलम ३९९,४०२ प्रमाणे दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, चाकण पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार जाधव हे सरकारी वाहन क्रमांक एम एच १४ बीसी ४९८५ मध्ये हवालदार भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल भोजने, पोलीस नाईक अमोल बोराटे यांच्यासह चाकण एमआयडीसीमध्ये रात्रगस्त करीत असताना मोटरसायकलवर निघोजे गावच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाजवळ संशयितरित्या उभे असलेले पाच तरुण पोलिसांना दिसून आले. त्यामुळे पोलीस त्यांच्याकडे विचारपूस करण्याकरिता गेले. मात्र पोलिसांना पाहताच ते सर्वजण पळून जाऊ लागले.

त्यामुळे पोलिसांनी त्यातील तिघांना मोटारसायकलसह जागीच पकडले. मात्र दुसऱ्या मोटरसायकल वरील दोन इसम तळवडे बाजूकडे पळून गेले. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आरोपींकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे एक चाकू, मिरचीपूड, कटावणी, नायलॉन दोरी असे साहित्य मिळून आले. एमआयडीसी मधील एचपी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात संबंधित सर्व जन असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.