Talegaon : बंगल्याची खिडकी काढून 14 किलो चांदी, 90 तोळे सोने, साडेतीन लाखांच्या डायमंड रिंगा व दीड लाखांची रोकड लंपास

एका नामांकित कंपनीच्या निवृत्त अधिका-याच्या बंगल्यात चोरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील एका नामांकित कंपनीच्या निवृत्त अधिका-याच्या बंगल्याची खिडकी काढून तब्बल 23 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. यामध्ये 14 किलो चांदी, 90 तोळे सोने, साडेतीन लाखांच्या डायमंड रिंगा, आणि दीड लाख रुपयांची रोकड चोरून नेलीय. दरम्यान, याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशोक रघुनाथ कोरे (63, रा. मधूबन स्मार्ट सिटी, चाकण रोड, तळेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

अशोक कोरे हे एका नामांकित कंपनीतून सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांचे तळेगाव आणि मुंबई येथे त्यांचे बंगले आहेत. मागील महिन्यात 14 ऑगस्टलात ते आपल्या कुटुंबासह काही कामानिमित्त बाहेर गेले होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याची खिडकी काढून कपाटातील 90 तोळे, सोने, 14 किलो चांदी, एक डायमंड हार, डायमंड रिंगा आणि दीड लाख रुपयांची रोकड चोरून नेली.

दरम्यान, काल शनिवारी (दि.1) कोरे हे बंगल्यात आले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, निरीक्षक अमरनाथ वाघमोडे व इतर अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.