Pimpri : तयारी गणेशोत्सवाची! औद्योगिकनगरीत घुमतोय ढोल ताशांचा आवाज 

एमपीसी  न्यूज –   गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील ढोल-ताशांची पथके सराव करू लागली आहे. मानसिक ताण कमी करणे, आवड आणि पारंपरिक कला जोपासणे अशा विविध कारणांसाठी यात तरुणाईचा सहभाग वाढत आहे.

रोज सायंकाळपासून  पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिकनगरीत असणा-या चौकाचौकात, गल्लोगल्लीत   ढोल-ताशांचा आवाज घुमू लागला आहे. यंदा गणेशोत्सव 13 ते 20 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.  बाप्पांच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत मोठा उत्साह दिसून येत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी प्रत्येकजण तयारीला लागला आहे. सर्वाधिक तयारी ढोल-ताशा पथकांची सुरू आहे.

सायंकाळी घराबाहेर पडल्यास शहराच्या कोपऱ्यावर, वळणावर एखाद्या चौकालगत ढोल-ताशाचे पथक सराव करताना दिसतात. या पथकांच्या नावांचे फलकही लावले असून, पथकात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू आहे. पथकात अगदी पाच वर्षांच्या मुलांपासून 40 ते 55 वयोगटापुढील सर्वांचा सहभाग असून तरुणींचा टक्काही वाढत असल्याचे चित्र आहे. या पथकांमध्ये शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, आयटी कंपन्यांमधील कर्मचारी, व्यावसायिक, उद्योजक असे समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती आहेत.

जसजसा दिवस मावळू लागतो, तसतसे शहरात ढोल-ताशा पथकांचे आवाज घुमायला सुरुवात होते. नवनवीन सदस्यांकडून तयारी करुन घेण्यासाठी तरबेज वादकांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल-ताशांनी डीजेला देखील पछाडले आहे. या पारंपरिक वाद्यांना मिळालेल्या पुन: जीवनामुळे सध्या लहान मुले आणि तरुणाई देखील ढोल-ताशा वादनाकडे आकर्षित होत आहे.

आपले पथक मोठे आणि वादनात सर्वोत्कृष्ट व्हावे, यासाठी पथकांतील जुन्या आणि वरिष्ठ वादकांची जुळवा-जुळव सुरू झाली आहे. सदस्य वाढल्यास नवे ढोल-ताशा आणणे, जुन्या ढोल-ताशांची दुरुस्ती, पाने बदलणे, अशी कामे करून घेण्यात आली आहेत. पथकांना नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था, पथकातील सदस्यांसाठी नवे गणवेश अशा कित्येक बाबींसाठी आर्थिक जुळवा-जुळव देखील पथकांतील वरिष्ठांना करावी लागते. परंतु हे सर्व काही करून सध्या सरावावर जोर दिला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.