Pimpri News : प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त छायाचित्र प्रदर्शनाद्वारे आठवणींना उजाळा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षणमंत्री दिवंगत प्रा.रामकृष्ण मोरे सरांच्या 18 व्या पुण्यतिथी निमित्त प्रा.रामकृष्ण मोरे प्रेमी मित्र परिवार व काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या वतीने आज (मंगळवारी) पिंपरी येथे सरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या छायाचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना याप्रसंगी उजाळा देण्यात आला.

पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मृती स्मारक येथे सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाची सुरूवात रामकृष्ण मोरे सरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.  सरांच्या जीवनाकार्यावर आधारित पोवाडा शाहीर सुरेश राव सुर्यवंशी सांगलीकर यांनी सादर केला. सर्वपक्षीय उपस्थित मान्यंवरांनी आपल्या जुन्या आठवणी व प्रसंगाना उजाळा देत सरांच्या कार्यांचे व गुणवैशिष्टांचे स्मरण केले.

या प्रसंगी बोलताना माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, महाराष्ट्रीतील भीषण दुष्काळ काळात विद्यार्थीची फी माफी, नोकरी बाबत मागण्या मान्य करवून घेण्यासाठी सरांनी लढा उभा केला. यश मिळवले. त्यांनी कार्यकर्त्यांना मोठे करण्यात भरीव योगदान दिले. ते वाचन प्रिय व अभ्यासू व्यक्तीमत्व होते. जाती धर्मापलिकडे जाऊन व्यापक राजकारणात करत कार्यकर्ते मोठे करण्याचे काम त्यांनी जीवनात केले. त्यांची विधीमंडळातील भाषणे शब्दफेक अतिशय उत्तम असे, त्यांची पोकळी आज भरून येऊ शकत नाही. पिंपरी-चिंचवडचा विकास त्यांच्या दूरदृष्टीने घडला, पत्रकारिता, नाट्य क्षेत्र, कला क्षेत्र, शिक्षण क्षेत्र यात नाविन्य आणण्याचे काम त्यांनी केले.

प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन म्हणाले, 1973 साली पुणे येथील तारचंद वैद्यकीय महाविद्यालयातील संपादरम्यान त्यांनी युवक काँग्रेसकडून संपास पाठिंबा दिला. तेव्हा पासून मी त्यांना ओळखत होतो. ते राजकारणी नव्हते तर ते कायम सक्रीय कार्यकर्ते होते. पक्ष कोणताही असो विचार महत्त्वाचा व काँग्रेस विचार कधीही संपू शकत नाहीत असे ते मानत होते. ते कायम आरएसएस व बीजेपी विरोधी होते.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, काँग्रेस मधील त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. सरांसमोर जाताना नेहमी आदरयुक्त भीतीचे वातावरण असे, कारण ते शिस्तीस कडक होते. कार्यकर्त्यांना केवळ राजकारणात नाही. तर, व्यवसायात देखील ते मदत करत. ते हजरजबाबी व अभ्यासू  व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलला. ते एक व्यासंग असणारे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या अनेक कार्यांचे आम्ही साक्षीदार होतो, ते मनाने खुप मोठे व विचारांनी प्रगल्भ होते”.

नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, “परखड व्यक्तीमत्वाचे धनी असेलेल्या सरांनी कायम राजकारणात पद नाही. तर, पत महत्त्वाची असते असे सांगितले. ती पत सरांनी राजकारणात निर्माण करून दिली.  मला आज स्पष्ट सांगावे लागेल की मी काँग्रेस सोडली नाही. तर, मला काँग्रेस सोडयला भाग पाडले गेले. आजही मनांत काँग्रेसचे स्थान आहे ते सरांमुळेच, मला सर कायम स्मृतीत आहेत, राहतील.”

या प्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, विलास लांडे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, देहू येथील सरांच्या भगिणी शामाताई परदेशी, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विलास कामठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक तात्या कदम, आप्पा बागल, विनायक रणसुभे, सतिश दरेकर, नारायण बहिरवाडे, सदगुरू कदम, प्रसाद शेट्टी, प्रकाश मलशेट्टी, विश्वास गजरमल उपस्थित होते.

तसेच युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, छायाताई देसले, पुजा बिबवे, के.एम.रॅाय, माऊली मलशेट्टी, के. हरीनारायणन, ईस्माईल संगम, विजय ओव्हाळ, बाबा बनसोडे, आबा खराडे, सौरभ शिंदे, श्याम भोसले, सतिश भोसले, कबीर मोहम्मद आदी पदाधिकारी व सरांचे बहूसंख्य चाहते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.