Pimpri News: महाविकास आघाडीच्या घराचा एक-एक कोना ढासळतोय – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्या सरकारच्या घराचा एक-एक कोना आता ढासळताना दिसत आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणजे सुरक्षा असते. पण, माजी गृहमंत्र्यांना अटक होणे चिंताजनक आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता सील केल्याची बातमी आली. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी घडणार आहेत, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुखांपासून नगरसेवक-पदाधिकाऱ्यांपर्यंत ‘ऑडिओ ब्रिज’द्वारे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिपावलीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे तसेच माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी ‘ऑडिओ बिज’द्वारे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांशी संवाद साधला. संवाद सेतूमध्ये महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, बाबू नायर आदी सहभागी झाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”महाराष्ट्रात 20 मार्च 2020 रोजी पहिला कोविड रुग्ण सापडला. त्यानंतर दीड-वर्षे प्रत्येकाला विविध आव्हानांचा सामना करावा लागला. कोविड विरुद्धच्या लढाईत आता नागरिकांचे दोन डोस पूर्ण होत आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळला आहे. परंतु, आजही अनेक कुटुंबियांची आर्थिक स्थिती अडचणींची आहे. आर्थिकदृष्टया अडचणींत असलेल्या कुटुंबियांनी भाजपा कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी मदत करावी. तसेच, फेब्रुवारी होणऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष आणि आपली प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत.”

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ”यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. शतकाहून अधिक काळात पाहिले नसलेले संकट बाजूला सारून आपण प्रकाशाकडे मार्गक्रमण करीत आहोत. गेल्यावर्षी कोरोना महामारीचे संकट आपल्यावर ओढवले. यामध्ये अनेक माझे बांधव,निकटवर्ती मला सोडून गेले. अनेकांच्या कुटुंबातील कर्ते आधार गेले. अनेक जण बेरोजगार झाले. मात्र, आता हा अंधकार बाजूला सारून आपल्याला पुढे चालायचे आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.