Pimpri News : खुशखबर! डिसेंबर अखेपर्यंत पीसीएमसी ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो धावणार

एमपीसी न्यूज – यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गावर पुणे मेट्रो धावणार आहे. सात किलोमीटर दरम्यान पाच स्टेशन आहेत. पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गावर भोसरी वगळता सर्व मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.

पुणे मेट्रोचे काम पुढील 13 महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. डिसेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करून पूर्ण क्षमतेने मेट्रो सुरु करण्यात येणार आहे, असा विश्वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे मेट्रो दोन कॉरिडॉरमध्ये विभागली असून यांमध्ये 30 स्थानकांचा समावेश आहे. पुणे मेट्रोची एकूण लांबी सुमारे 33.1 किमी आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या कॉरिडॉरची (कॉरिडॉर- 1) लांबी 17.4 किमी असून यामध्ये शिवाजी नगर ते स्वारगेट असा 6 किमीचा भुयारी मार्ग आहे, तर वनाज ते रामवाडी (कॉरिडॉर 2) या मार्गाची लांबी 15 किमी असून हा मार्ग उन्नत आहे.

पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यत पुणे मेट्रोचे 65 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच प्रवाशांसाठी प्राधान्य विभाग (मार्ग) कार्यान्वित होणार आहेत. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय असे हे प्राधान्य विभाग (मार्ग) आहेत. पुणे मेट्रो प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे .

पुणे मेट्रोने आपल्या प्रकल्प उभारण्याच्या सुरुवातीपासून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध हरित उपक्रम हाती घेतले आहेत. सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर, पावसाचे पाणी साठवण, बायोडायजेस्टर, वृक्षारोपण, झाडांचे पुनः रोपण आणि हरित इमारती हे काही उल्लेखनीय उपक्रम आहेत. पुणे मेट्रोच्या मार्गिकेत येणारे एकही झाड पुणे मेट्रोने तोडलेले नाही.

पुणे मेट्रोने नाविन्यपूर्ण रूट-बॉल तंत्रज्ञानाद्वारे मार्गिकेत येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण  करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या विविध उद्यान आणि परिसरात ही झाडे लावण्यात आली आहेत. पुणे मेट्रोने आतापर्यंत 2261 झाडांचे पुनर्रोपण पूर्ण केले आहे. याशिवाय पुणे मेट्रोने पुणे शहर आणि आसपासच्या विविध ठिकाणी 15 हजारहून अधिक नवीन झाडे लावली आहेत. प्रत्यारोपणानंतर 80 टक्क्यांहून अधिक झाडे जगली आहेत.

रिच 1 या मार्गिकेची काम 83.2 टक्के पूर्ण झाले आहे. रिच 2 या मार्गिकेचे काम 95.8 टक्के आणि रिच 3 या मार्गाची एकूण काम 55 टक्के पूर्ण झाले आहे. संत तुकाराम नगर स्टेशनचे काम पूर्ण झाले असून फुगेवाडी स्टेशनचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. प्राधान्य विभाग 1 (संत तुकाराम नगर ते फुगेवाडी) आणि विभाग 2 (वनाज ते गरवारे कॉलेज) येथील स्थानकांची कामे 50-60 टक्के पूर्ण झाली आहे. मेट्रोच्या एकूण 12 किमी लांबीच्या भुयारी मार्गापैकी 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. इलेक्ट्रिक ओएचईचे (OHE) काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. रेंज हिल डेपोचे काम 83 टक्के पूर्ण झाले आहे तर हिल व्ह्यू पार्क डेपोचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

पीसीएमसी ते निगडी या साडेचार किलोमीटर अंतरावरील मेट्रो मार्गाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यात काही त्रुटी निघाल्याने तो परत पाठवण्यात आला. त्रुटी दुरुस्त करून हा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल असा विश्वास अतुल गाडगीळ यांनी व्यक्त केला. या वाढीव साडेचार किलोमीटरच्या मेट्रो मार्गावर तीन स्टेशन असून मान्यता मिळाल्यास पहिल्याच टप्प्यात हे काम होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.