Pune news: सालिम अली पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी आंदोलन

एमपीसी न्यूज:  येरवडाभागातील अतिशय जैवविविधतेने नटलेले हरित पट्टा म्हणजे डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे. त्यात सुमारे ११० विविध प्रजातीचे पक्षी या ठिकाणी येतात. डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्ष्यांसाठी अधिवास आहे. परंतु, बेसुमार वृक्षतोड आणि कच-याचे साम्राज्य यामुळे येथील अस्तित्वच धोक्यात आले आहे. मुळा-मुठा नदीकिनारी असलेल्या डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात अतिक्रमण करून शेकडो-हजारो ट्रक राडारोडा टाकून येथील नालाही बुजवण्यात आला आहे.

यामुळे या अभयरण्याची जैवविविधता धोक्यात आल्याने याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आमदार सुनील टिंगरे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, अतिरीक्त पालिका आयुक्त कुणाल खेमणार यांनी आंदोलनकर्त्यांसमवेत अभयारण्याची पाहणी केली. अधिका-यांनी त्वरित कारवाईची पावले उचलण्याचे निर्देश दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माय अर्थ फांउडेशनचे अनंत घरत, नगरसेवक बंडू तात्या गायकवाड, डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीचे समीर निकम, शैलेश राजगुरू, मेघना बाफना, महेश गौडेलर, धर्मराज पाटील, प्रदीप रहेजा, बिरेन भट, राकेश जगताप, पौर्णिमा जोशी, सत्या नटराजन आदी उपस्थित होते.

सचिन अहिर म्हणाले की, अभयारण्याच्या सीमा निश्चित करुन नाल्यातील राडारोडा काढण्यात यावा, राडारोडा टाकणाऱ्यांना केवळ नोटिसा न देता, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. दिवाळीनंतर पुण्यातील विविध पर्यावरणाचे विषय घेऊन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर याविषयी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी, पालिका आयुक्त व पर्यावरणप्रेमी संस्था आणि आंदोलनकर्त्या समितीचे सदस्य या बैठकीमध्ये निमंत्रित असणार आहेत.

अतिरीक्त पालिका आयुक्त कुणाल खेमणार यांनी याबाबत त्वरित कारवाई व गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.