T20 WC – साऊथ आफ्रिकेने श्रीलंका संघांवर मिळवला अखेरच्या षटकात रोमहर्षक विजय

एमपीसी न्यूज -(विवेक कुलकर्णी) – आजच्या शारजा मैदानावर झालेल्या ग्रुप एच्या सुपर 12 मधल्या 25 व्या सामन्यात साऊथ आफ्रिका संघांने नाणेफेक जिंकून श्रीलंका संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण श्रीलंका संघाने सुरुवात काही चांगली मिळाली नाही, तसाही लंकन संघ सध्या अनुभवी खेळाडूंचा झालेला आहे. प्रतिभा असली तरी वर्ल्डकपच्या मोठ्या व्यासपीठावर लागणारी मानसिक कणखरता अजूनही लंकन खेळाडूंना दाखवता आलेली नाही.

आजही त्यांनी भागीदारीकडे लक्ष न देता केवळ वेगवान धावा जमवण्यासाठी खेळ केला, ज्यामुळे त्यांच्या ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या. त्यामुळे त्यांना मोठे आव्हान उभे करता आले नाही. त्यांनी 20 षटकात सर्वबाद 142 धावा केल्या. आफ्रिकन संघांकडून डावखुरा चायनामन तबरेज शमसीने आजही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत श्रीलंका संघाला तीन हादरे देताना यावर्षीचा 20/20मधला सर्वाधिक 31 बळीचा विक्रम आधी गाठत आणि नंतर 32 वा बळी घेत श्रीलंकन गोलंदाज हसरंगा आणि अँड्र्यू टायला मागे टाकत नवीन किर्तीमान आपल्या नावे स्थापन केला.

श्रीलंका संघाकडून सलामीवीर पथम निसंकाने एकाकी झुंज देत सर्वाधिक 72 धावा केल्या,त्याला दुसऱ्या बाजूने म्हणावी तशी साथ मिळाली नाही.असलंकाच्या 21 धावा सोडल्या तर इतर फलंदाज आले आणि गेले,ज्यामुळे धावफलकावर त्यांच्या 142 धावाच जमा झाल्या.आफ्रिका संघाकडून शमसी व प्रिटोरियसने तीन तीन तर नोर्जेने दोन बळी घेत लंकन डावाला रोखण्यात यश मिळवले.

दरम्यान, 143 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आफ्रिकन संघाची पण चांगलीच दमछाक उडाली. 50 धावांच्या आतच त्यांच्या तीन विकेट्स गेल्या होत्या,पण कर्णधार बाऊमाने मारक्रम बरोबर 46 धावांची भागीदारी करून डाव सावरला. मात्र मारक्रम बाद झाल्यानंतर 112 या धावसंख्येवर बाऊमा आणि प्रिटोरियस बाद झाल्याने सामना रंगतदार अवस्थेकडे झुकला.

दडपणाखाली आफ्रिका संघाच्या धावगतीलाही चाप बसला. एकवेळ तर श्रीलंका संघ सहज जिंकेल असे वाटत असतानाच डेव्हिड मिलरने आपल्या अनुभवाच्या जोरावर संघाला अखेरच्या षटकात रबाडाच्या साथीने आक्रमक अंदाजात जिंकून देत आपल्या संघाची विजयी वाटचाल चालूच ठेवली.तर या पराभवाने श्रीलंका संघाला मात्र पुढे मुश्किल आव्हान असणार हे नक्की!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.