Pune news: पुण्यात दिवाळी पहाटचे यंदा 16 कार्यक्रम

एमपीसी न्यूज : पुणे शहराची ओळख निर्माण झालेली दिवाळी पहाट आणि दिपोत्सव यंदा महापालिकेच्या उद्यानांमध्ये रंगणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिपोत्सवासाठी महापालिकेकडे 16 अर्ज आले असून ते अर्ज अंतिम मंजुरीसाठी वरीष्ठ अधिकार्‍यांकडे पाठवण्यात आले आहेत.

दरवर्षी दिवाळीमध्ये विविध संस्थांकडून दिवाळी पहाटच्या माध्यमातून सांगिताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हे कार्यक्रम नाट्यगृहांसह शहरातील विविध उद्यानांमध्ये आयोजित केले जातात. यामध्ये सारसबागेत कार्यक्रम घेण्यास संस्थांकडून प्राधान्य दिले जाते. शहरात 2018 मध्ये सारसबाग, पु.ल. देशपांडे उद्यानातील जॅपनीज् गार्डन, तळजाई उद्यान, एरंडवणा येथील ताथवडे उद्यान, सोमवार पेठेतील शाहू उद्यान, लोहिय्या नगरमध्ये डॉ. राम मनोहर लोहीय्या उद्यान आदी ठिकाणी 10 ते 15 कार्यक्रम झाले होते.

मात्र, गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे उद्याने व नाट्यगृहांमध्ये दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनेक संस्थांनी वर्षानुवर्षे सुरू असलेला पायंडा न मोडता ऑनलाईन पद्धतीने दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जात आहेत. माध्यमिक शाळांसह महाविद्यालये, खासगी क्लासेस, नाट्यगृहे, चित्रपट गृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या आदेशामध्ये नाट्यगृहांसह मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

या अनुषंगाने महापालिका प्रशासनाकडे विविध संस्था आणि व्यक्तींनी महापालिकेच्या उद्यानांमध्ये दिवाळी पहाट व दिपोत्सव घेण्यास परवानगी मागणारे अर्ज केले आहेत. हे अर्ज उद्यान विभागाने मालमत्ता विभागामार्फत अतिरीक्त आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले आहेत. शासनाच्या नियमानुसार शुल्क आकारून त्याला परवानगी दिली जाणार आहे.

या उद्यानांमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी आले अर्ज :
सारसबाग, सिंहगड रस्त्यावरील पु.ल. देशपांडे, महाराष्ट्र हौसिंग बोर्डातील लुंबीनी उद्यान, मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटीका उद्यान, टिंगरे नगरमधील मोरया उद्यान, वडगाव येथील चरवड उद्यान, शिवाजीनगर येथील कमला नेहरू, येरवडा येथील हुतात्मा स्मारक, नानासाहेब पेशवे तलाव, घोरपडे उद्यान, कोंढवा येथील लोणकर उद्यान, लोकमान्य जॅगींग पार्क, मंगळवार पेठेतील तिकोणे उद्यान आदी ठिकाणी दिवाळी पहाटचे जळपास 16 कार्यक्रम घेण्यासाठी विविध संस्थाकडून महापालिकेला अर्ज आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.