Pune : महावितरण कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी (दि.22) दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. 23 मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी न जाता  सरासरी बिल पाठविण्याची सूचना केली आहे.

या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नसून वीज बिल महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावे, सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर बिलासंबंधीचे संदेश पाठविण्यात यावा असा आदेश राऊत यांनी दिला आहे.

या कालावधीत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा  करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे व  ग्राहकांच्या विजेबाबतच्या तक्रारी स्वतःची योग्य काळजी घेऊन निवारण करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रात मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध आसल्यामुळे तक्रार टोलफ्री नंबरवर नोंदविण्यासाठी विलंब लागू शकतो त्यामुळे ग्राहकांनी आपल्या वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारी महावितरण पोर्टल व मोबाइल अॅपद्वारे नोंदवाव्यात, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.