Kanyakumari : साठीतील तरुणांची पुणे ते कन्याकुमारी सायकल वारी

(स्वाती राठोड)

एमपीसी न्यूज – पुणे ते कन्याकुमारी जवळपास 1500 किमी अंतर ट्रेन किंवा बसने कापायचे म्हटले तरी पंचविशीतील तरुणही थकतात मात्र पुण्यातील साठीतील रिटायर्ड झालेल्या एका सायकलिस्ट ग्रुपने सायकलवरून हा प्रवास तर केलाच पण त्यानंतरही न थकता संपूर्ण कन्याकुमारीची त्यांनी भ्रमंती करून येथील स्वामी विवेकानंद केंद्रातील योग शिबिरार्थींसोबत संवाद देखील साधला.

केंद्रात संपूर्ण भारतातून योग प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणांना यावेळी त्यांनी सायकलिंगचे महत्व आणि प्रवासातील अनुभव कथन केले. विवेकानंद केंद्र पुणे येथील कार्यकर्ते अरविंद चितळे हे आणि त्यांचे इतर काही मित्र हे सायकलिंगची आवड म्हणून दररोज सायकलिंग करतात. मग सायकलिंगची आवड असणारे मित्रांचे मित्र असा मिळून एक ग्रुप तयार झाला. त्यात जवळपास सगळ्यांनीच साठी पार केली आहे.

दररोज सायकलिंग निमित्त भेटत गेल्यावर सायकलची आवड लोकांमध्ये रुजावी तसेच त्याचे आरोग्याबाबतचे फायदे लोकांना पटवून देण्यासाठी पुणे ते कन्याकुमारी असा प्रवास करायची संकल्पना पुढे आली. सुरुवातीला एक दोन जणांच्या घरातील तरुण मुलाचा त्याला विरोध होता. या वयात सायकलिंग जमेल का असा सल्लाही दिला. मात्र एकदा निश्चय केल्यावर थांबायचे नाही. म्हणून सगळ्यांनीच प्रवासाची रुपरेखा आखून आपली सायकलवारीला सुरुवात केली.

दररोज 150 किमी एवढे अंतर कापायचे ठरले. आणि कन्याकुमारी पर्यंतचा टप्पा साधारण 10 दिवसात पार केला. त्यांच्या या ग्रुपमध्ये काही जण डायबिटीजचे पेशंट ही आहेत. मात्र सायकलिंगचा त्यांना फायदाच झाला. प्रवासात लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण प्रवासात त्यांनी सायकलिंगचे फायदे लोकांना पटवून दिले.

आपला अनुभव सांगताना गोखले म्हणाले की, इतरांपक्षा आपण कितीतरी पटींनी चांगले जीवन जगत आहोत तरीही आपण सतत तक्रार करत असतो. आयुष्य हे कधीही अप आणि डाऊनप्रमाणे असते. एकाच स्थितीत कोणीही खूप काळ राहत नाही. त्यामुळे ते सायकल प्रमाणे असते.

एक काळी पुणे सायकल चे शहर होते. मात्र आता प्रत्येक जण गाड़ीच वापरतात. हे बदलायला हवे. पुणे आता स्मार्ट सिटी होत आहे. तर तिथे चांगले सायकल ट्रॅक सरकारने बनवायला हवे. जेणेकरून अधिकाधिक लोक सायकलचा वापर करतील असे चितळे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

सायकलिस्ट ग्रुप

अविनाश मेढेकर (वय-60, सीए), पद्माकर आगाशे (वय-64, तांत्रिक सल्लागार), अनिल पिंपलीकर (वय-66 रोपवाटिका आणि लँडस्केपिंग), विजय हिंगे (वय-57 वनविभागाचे अधिकारी), डॉ. सुभाष कोकणे (वय-65), दत्तात्रय गोखले (वय-59 सीए), केशव जागीरदार (वय-46 उद्योजक), सुहास सोमन (वय-69 सेवानिवृत्त बँक अधिकारी ), प्रशांत वाशीमकर (वय-53 सल्लागार), अरविंद चितळे (वय -60 फ्रीलान्स अभियंता आणि आर्थिक नियोजक), मिलिंद संधाने (वय-60 निवृत्त बँक अधिकारी), दत्तात्रय मेहंदळे (वय-77 सेवानिवृत्त), लहू भिसे (वय-35)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.