Bhosari: आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांना आधार देणारे स्नेहवन


(शर्मीला पवार)

बाबा आमटेंचा वसा चालवण्याचा एक छोटा मात्र कौतुकास्पद प्रयत्न; स्नेहवनला मदतीची आस

एमपीसी न्यूज – एकला चलो रे चा नारा देत एका तिशीतील तरुणाने मोठ्या पगाराची नोकरी सोडत अवघ्या चार रुमच्या घरात 25 अनाथ व गरजु मुलांना आधार देण्याचे काम सुरु केले आहे. ज्या शेतक-यांनी कर्जबाजारीपणापोटी आत्महत्या केल्या त्यांच्या मुलांना आधार मिळावा यासाठी स्नेहवनच्या माध्यमातून आधार देण्यात येत आहे.

या अवलियाचे नाव आहे अशोक देशमाने. देशमाने हे मुळचे परभणीचे. परभणी येथूनच त्यांनी सॉफ्टवेअर इंडीनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना 2012 मध्ये पुण्यामध्ये एका खासगी कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली. प्रगती चांगली होती. चांगला गलगठ्ठ पगार होता. मात्र सुट्टीला गावाला गेल्यानंतर तिथली परिस्थीती काही अशोक यांना स्वस्थ बसू देत नव्हती. महाविद्यालयात असताना एका कार्यक्रमामध्ये त्यांनी बाबा आमटे यांचे विचार ऐकले होते. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी फूल ना फूलाची पाकळी म्हणून स्वतःच्या पगारातील काही हिस्सा आत्महत्या  ग्रस्त शेतक-यांच्या मुलांना देण्यास सुरवात केली. यामध्ये त्यांचे शाळेचे साहित्य, शाळेच्या फीस भरण्यास सुरुवात केली. मात्र मनासारखे काम व समाधान मिळत नव्हते.त्यातून 2015 साली नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला व त्यांनी पूर्णवेळ या कामाला देण्याचे ठरवले.

यातून त्यांनी डिसेंबर 2015 मध्ये भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीत  एका मित्राच्या सहाय्याने ‘स्नेहवन’ सुरु केले. अशोक यांच्या मित्राने एक रुपयाही भाडे न घेता मित्राच्या या कामाला घर देऊ केले. याच घरात  18 मुलांपासून कामाला सुरुवात झाली. एका वर्षात मुलांची संख्या 25 वर गेली. 

स्नेहवन हा कोण्या बाबा-बुवाच्या मठा एवढी मोठी संस्था नाही तर अवघ्या चार रुमच्या घरात ही संस्था काम करते. जिथे देशमाने यांचे कुटुंब व ही 25 मुले अगदी एकोप्याने राहतात. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या दिनक्रमाला सुरुवात होते. योगा, अभ्यास नंतर आवरा-आवर करुन शाळा, शाळेतून येताच संगणक, संगीत अशी वेगवेगळे इतर  कलागुणही  येथे जोपासले जातात. यासाठी आठवड्यातून दहा शिक्षक तेथे येतात व मुलांना संगणक, गायन, कराटे, हस्तकला असे विविध कला शिक्षण देतात. याबरोबरच आणखी एक अनोखा उपक्रमही मुलांसाठी राबवला जातो. त्याचे नाव आहे ‘वन बुक वन मुव्ही’ यामध्ये आठवड्यासाठी मुलांना एक पुस्तक वाचायला दिले जाते. जिथे मुल पुस्तक वाचतात व आठवड्याच्या शेवटी त्यांना एक चित्रपटही दाखवला जातो तोही त्यांच्या आवडीचा.

अशोक यांच्या कार्यात त्यांचे वडील बाबाराव देशमाने, आई सत्यभामा व पत्नी अर्चना यांची मोलाची साथ मिळते. अर्चना यांनी तर अगदी लग्न झाल्या पासून  मुलांसह 30 माणसांचा स्वंयपाक कऱण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. मुलांनी केलेला पसारा आवरण्यापासून त्यांचे खाणे-पिणे सारे ते एखाद्या आईप्रमाणे करतात.  जे आजकालच्या मुलींना अशक्य आहे. तर अशोक यांच्या आई-बांबानी तर गाव शेती सोडून मुलाच्या कामात हातभार लाण्यास सुरुवात केली आहे. बाबा मुलांमध्ये खेळतात, रमतात व मुलांना तबला, मृदंग, भजन, अभंग देखील शिकवतात तर आई सत्यभामा या मुलांना आजीची माया व शिस्त लावतात.

अशोक यांच्याकडे विदर्भ मराठवाड्यातूल विविध भागातील मुले आहेत त्यांची जबाबदारी तर आहेच पण त्या बरोबरच आसपासच्या परिसरातील कचरा वेचकांची मुल, नंदीबैल किंवा इतर परिस्थितींशी सामना करणा-या मुलांच्याही शिक्षणाची ते जबाबदारी घेत आहेत.

स्नेहवन ला मदतीची आस


स्नेहवनच्या या कामाची दखल अनेक माध्यमांनी घेतली आहे. अनेक दिग्गजांनीही संस्थेला भेट देऊन कौतुक केले आहे. मात्र आता या मुलांना गरज आहे ती तुमच्या मदतीची . कारण आज मितीला एवघ्या चार रुमच्या घरात तीस माणसे गुण्यागोविंदाने रहात असली तरी पुढे त्यांना जागेची गरज आहे, महिन्याकाठी 7 ते 8 हजार खर्च येतो. आजही मित्रपरिवार व इच्छुकांच्या मदतीतून स्नेहवन तग धरुन आहे. मात्र केवळ वर्षाकाठी होणा-या वाढदिवसांच्या भेटी पलीकडे स्नेहवनला मदतीची गरज आहे. मुलांचे जेवण, शिक्षण, राहण्यास जागा अशा अनेक अडचणींवर मात करत हे रोपटे उभे आहे. मात्र समाजानेही त्याला खतपाणी देणे गरजेचे आहे.

कशी कराल मदत

धान्य, आर्थिक मदत, पुस्तके, शालेय साहित्य अशा स्वरुपात इच्छुक त्यांची मदत भोसरी येथील चक्रपाणी वसाहत येथील हनुमान नगर येथे स्नेहवनला स्वतः भेटून मदत करु शकतात किंवा पिंपरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील ‘स्नेहवन’ (खाते क्रमांक 35517151681 )या बँक खात्यावर ही मदत देऊ शकतात. तसेच  अशोक देशमाने यांच्या 8796400484 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

प्रत्येकाल असे समाज कार्य करणे शक्य नसले तरी या समाजकार्याला हातभार लावणेही अशक्य नाही. त्यामुळे पुढे या व जमेल तशी मदत करा असे आवाहन स्नेहवनतर्फे करण्यात आले आहे.  

"Ex.

"Famous

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.