Pune : येत्या 11 ते 15 डिसेंबर दरम्यान रंगणार 67 वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल या ठिकाणी युवासह ज्येष्ठ गायकांची कलाप्रस्तुती

एमपीसी न्यूज -आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी बुधवार दि. ११ डिसेंबर ते रविवार दि. १५ डिसेंबर, २०१९ या पाच दिवसांदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे.

महोत्सवाचे हे ६७ वे वर्ष असून या वर्षीच्या महोत्सवात कला सादर करणा-या कलाकारांची नावे व महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. पु. ना गाडगीळ अॅण्ड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अतुल गलांडे आणि बुलढाणा अर्बन को. क्रेडीट सो. लि बँकेचे उदय पाचपांडे आदि या वेळी उपस्थित होते.

यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास फिनोलेक्स, श्री धूतपापेश्वर लि., पु. ना गाडगीळ अॅण्ड सन्स, युनियन बँक, नांदेड सिटी, डी. वाय. पाटील विद्यापीठ, पृथ्वी एडीफीस, बुलढाणा अर्बन को. क्रेडीट सो. लि बँक, गोखले कन्स्ट्रक्शन्स, सुहाना मसाले, लोकमान्य मल्टीपर्पज को. सो. लि. आशा पब्लिसिटी आणि इंडियन मॅजिक आय यांचे सहकार्य लाभले आहे.

यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात तब्बल २९ कलाकार आपली कला सादर करतील. यात देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील कलाकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार यांबरोबरच परदेशी कलाकाराचा देखील समावेश असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

महोत्सवाची वेळ पहिले तीन दिवस म्हणजेच बुधवार दि. ११ डिसेंबर ते शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्रौ १० अशी तर चौथ्या दिवशी म्हणजेच शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्रौ १२ अशी असेल. शेवटच्या दिवशी (रविवार दि. १५ डिसेंबर रोजी) महोत्सवाची वेळ दुपारी १२ ते रात्रौ १० असेल.

महोत्सवातील कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे –
बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या गायनाने ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात होईल. हे वर्ष पं. फिरोज दस्तूर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचेच औचित्य साधत त्यांचे शिष्य असलेले संझगिरी त्यांना आदरांजली वाहतील. यानंतर जयंती कुमरेश यांचे कर्नाटकी शैलीतील वीणावादन होईल. यानंतर पं. माणिक वर्मा यांच्या शिष्या असलेल्या अर्चना कान्हेरे यांचे गायन होईल. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाने होईल.

गुरुवार दि. १२ डिसेंबरच्या दुस-या दिवसाची सुरुवात उस्ताद मशकुर अली खान यांचे शिष्य व किराणा घराण्याचे संदीप भट्टाचार्जी यांच्या गायनाने होईल. त्यानंतर झारखंडचे असलेले व केडिया बंधू म्हणून ओळखले जाणारे मनोज केडिया व मोर मुकट केडिया या बंधूंचे सरोद व सतार वादन होईल. यानंतर पुण्यातील मंजिरी कर्वे – आलेगांवकर आपली गायनसेवा सादर करतील. आलेगांवकर या जयपूर घराण्याचे गायक वामनराव देशपांडे यांच्या शिष्या आहेत. दुस-या दिवसाचा समारोप पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने होईल.

शुक्रवार दि. १३ डिसेंबरच्या तिस-या दिवशी महोत्सवाची सुरुवात ‘धृपद सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणा-या व पं. रमाकांत आणि उमाकांत गुंदेचा यांच्या शिष्या असलेल्या अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर आणि अनुजा बोरुडे यांच्या सादरीकरणाने होईल. यावेळी अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर यांचे धृपद गायन तर अनुजा बोरुडे यांचे पखवाज वादन होईल. यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू व श्रीनिवास जोशी यांचे शिष्य व सुपुत्र विराज जोशी यांचे गायन होईल. त्यानंतर केन झुकरमन यांचे सरोदवादन होईल. केन झुकरमन हे मुळचे स्वित्झर्लंडचे असून ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य आहेत. तिस-या दिवसाचा समारोप मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या गायनाने होईल.

शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी ओंकारनाथ हवालदार यांच्या गायनाने शनिवारच्या महोत्सवाला सुरुवात होईल. ओंकारनाथ हवालदार हे पं. नागराज हवालदार यांचे सुपुत्र आहेत. यानंतर तेजस उपाध्ये आणि शाकीर खान यांचे व्हायोलिन व सतार सहवादन होईल. तेजस उपाध्ये हे व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे सुपुत्र आहेत तर शाकीर खान हे उस्ताद शाहीद परवेज यांचे पुत्र आहेत. त्यानंतर रामकृष्ण मठाचे संन्यासी असलेल्या स्वामी कृपाकरानंद यांचे गायन होईल.

वाराणसीस्थित स्वामी कृपाकरानंद हे पं. जगदीश प्रसाद यांचे शिष्य आहेत. यानंतर ओडिसी नृत्यांगना रीला होता यांचे ओडिसी नृत्य होईल. त्यानंतर जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे – देशपांडे यांचे गायन होईल. तर जागतिक कीर्तीचे व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने शनिवारच्या दिवसाचा समारोप होईल.

रविवार दि. १५ डिसेंबर रोजी महोत्सवाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर यांच्या गायनाने होईल. त्यांच्या नंतर पं. उल्हास कशाळकर यांच्या शिष्या रुचिरा केदार यांचे गायन होईल. त्यानंतर पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य चंद्रशेखर वझे हे आपली गायनकला सादर करतील. यानंतर प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार यांचे सतारवादन होईल. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट हे यानंतर आपली गायनकला सादर करतील. पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे गायन यानंतर होईल. तर ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप परंपरेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने होईल.

महोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करणारे कलाकार खालीलप्रमाणे –
संदीप भट्टाचार्जी, मनोज केडिया व मोर मुकुट केडिया (केडिया ब्रदर्स), अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर व अनुजा बोरुडे (धृपद सिस्टर्स), विराज जोशी, ओंकारनाथ हवालदार, तेजस उपाध्ये, स्वामी कृपाकरानंद, रीला होता, अतुल खांडेकर, रुचिरा केदार आदि.

महोत्सवाची तिकीट विक्री–
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी सीझन तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये खुर्चीसाठी रु. ४ हजार व रु. ३ हजार हा सीझन तिकिटाचा दर आहे. तर दर दिवशीची खुर्ची ही रु. ८५० मध्ये उपलब्ध होईल. भारतीय बैठकीसाठी सीझन तिकीट हे रु. ४९९ इतके असून दर दिवशीचा भारतीय बैठकीचा दर हा रु. २०० आहे. दर दिवशीची खुर्ची व भारतीय बैठकीची तिकिटे ही कधीही घेता येणार असून संपूर्ण सीझनमध्ये कोणत्याही एका दिवशी ती श्रोत्यांना वापरता येतील.

महोत्सवाची तिकीट विक्री ही रविवार १ डिसेंबर सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार असून शनिपार येथील बेहेरे आंबेवाले, कमला नेहरू पार्क समोरील शिरीष ट्रेडर्स (बोधनी), यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील नावडीकर म्युझिकल्स आणि अरण्येश्वर, सहकार नगर येथील अभिरुची फूड्स या ठिकाणी उपलब्ध असतील. याशिवाय १ डिसेंबर सकाळी ९ वाजल्या पासून www.esawai.com या संकेतस्थळावर देखील तिकिटे उपलब्ध असतील याची नोंद घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.