Pune : विनातिकीट प्रवास करणाऱ्या 37 हजार प्रवाशांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात (Pune) विनातिकीट प्रवास करणाऱ्या 37 हजार पेक्षा अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून तीन कोटी नऊ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे विभागाकडून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम सुरु असते. प्रवाशांनी तिकीट काढून रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेकडून सातत्याने केले जाते. मात्र अनेकजण विनातिकीट प्रवास करणे पसंत करतात.

पुणे रेल्वे विभागात नोव्हेंबर महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान 28 हजार 301 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून 2 कोटी 50 लाख 63 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

तसेच 9 हजार 386 जणांना अनियमित प्रवासासाठी 58 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 205 जणांकडून 21 हजार 240 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Sangvi : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण; तुकाराम सुपे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नोव्हेंबर महिन्यात तिकीट तपासणीतून पुणे रेल्वे विभागाला 3 कोटी 9 लाख 35 हजार 824 रुपये उत्पन्न मिळाले. विभाग सुरू झाल्यापासून मासिक तिकीट तपासणीचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे. एप्रिल 2023 मध्ये दोन कोटी 80 लाख रुपये सर्वाधिक उत्पन्न होते. तो रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड निर्माण केला आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने (Pune) सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.