Pune : अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण; पुणे महापालिकेतील प्रकार

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर मुक्त टिळक यांच्या दालनात बेदम मारहाण केल्याची घटना आज घडली आहे. जलपर्णी हटविण्याच्या गैरव्यवहाराबाबत नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तब्बल आठ पट दराने जलपर्णीची निविदा काढल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात आज दुपारी आंदोलन सुरू केले होते. यावेळी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली.

  • दरम्यान, याचवेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे महापौरांना माहिती देत होते. नगरसेवकांनी याला आक्षेप घेत ज्यांच्या अधिकाराखाली निविदा प्रक्रिया राबवली त्यांच्याकडून खुलासा नको. अधिकारी चोर आहेत, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. याच्या उत्तरात निंबाळकर यांनी आम्ही येथे तुमचे ऐकून घ्यायला आलो नाही, असे म्हणत कडक शब्दांत त्यांना सुनावले. यामुळे नगरसेवक संतप्त झाले. तुम्ही आमची लायकी काढणारे कोण?, असे म्हणत निंबाळकर यांना जाब विचारू लागले. यावेळी येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याने निंबाळकर यांच्या श्रीमुखात लगावली.

दरम्यान, वातावरण अधिक चिघळल्याने सुरक्षारक्षकांनी निंबाळकर यांना तेथून बाहेर नेले.  या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनीही अतिरिक्त आयुक्तांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. त्यापूर्वी त्यांनी आयुक्तांशी बोलून जलपर्णीची निविदा रद्द करण्याचे आदेश दिले. आणि चोवीस तासात याप्रकरणी तपासणी करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.