Pune : ऐतिहासिक ‘आंबील ओढा’ पुस्तकाचे शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – भौगोलिक माहिती प्रणालीचे (Pune) संशोधक आणि ग्राफियाज सोल्युशन्सचे संचालक डॉ. श्रीकांत गबाले व मंजुश्री पारसनीस लिखित ‘आंबील ओढा – बॅबलींग ब्रुक टू नॅस्टी ड्रेन’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी आयोजित करण्यात आले आहे. 

साज हॉल येथे दुपारी पावणे एक वाजता हे प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार असून, ग्राफियाज सोल्युशन्स आणि वंचित विकास पुणे या संस्थांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम आयोजिला आहे,

पुस्तकाविषयी बोलताना श्रीकांत गबाले म्हणाले, “गेल्या 10 वर्षांपासून आंबील ओढा विषयावर काम करत आहे. पुण्यासह शेजारील गावांवर या विषयासंबंधी पीएचडी केली आहे. भौगोलिक माहिती प्रणाली व दूरसंवेदनाचा वापर करून शहरातील पाणवठे, नैसर्गिक प्रवाह, झरे, भौगोलिक स्थिती, भूशास्त्र, भूगर्भातील परिस्थिती, पावसाचे मापदंड, जैविक घटकांशी संबंध, परिसरातील वाढती लोकसंख्या, सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार नैसर्गिक प्रवाहासाठीचे नियम व या संबंधित (Pune) इतर समस्यांचा उहापोह या पुस्तकात केला आहे.

मंजुश्री पारसनीस या परिसरात राहत असून, त्यांचा जैवविविधता, पर्यावरण शास्त्रावर सखोल अभ्यास आहे. 2019 मध्ये आलेल्या पुरानंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आंबील ओढ्यातील जैवविविधता आणि पर्यावरण शास्त्र या अनुषंगाने लेखन केले आहे.

Pimpri : प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची मदत

या पुस्तकात ऐतिहासिक आंबील ओढ्याची पेशवेकालीन स्थिती आणि आता त्यामध्ये झालेला कायापालट यावरही प्रकाश टाकला आहे. येथील समस्यांवर शास्त्रशुद्ध उपाय सांगण्याचा प्रयत्न यातून केला आहे. विकास आणि नैसर्गिक घटकांचा समतोल साधण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. शासकीय स्तरावर अहवाल बनविताना हा संदर्भग्रंथ ठरू शकेल,” असे श्रीकांत गबाले यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.