Pune : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पर्यायी टीम हवी : हेमंत बागुल

Alternative team needed for corona virus prevention measures: Hemant Bagul : फिल्डवर कार्यरत असताना एखादा अधिकारी कोरोना बाधित झाल्यास त्याच्या नियंत्रणाखालील निर्णय स्थगित होवून अवलंबित्व वाढत जाते.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ हे गेले 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहेत. कोरोनाचा संसर्ग हा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे या संदर्भातील उपाययोजनांसाठी पर्यायी टीमची उपलब्धता करण्यात यावी, अशी मागणी आधार सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बागुल यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की नुकतेच पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख व 2 सहाय्यक आरोग्य प्रमुख हे रजेवर असल्याचे समजले. पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सुमारे 35 हजारांपर्यंत पोहोचला असून दिवसेंदिवस यामध्ये भर पडत आहे.

यासाठी महानगरपालिका प्रशासन 24 बाय 7  काम करत आहे. यामध्ये प्रामुख्याने खातेप्रमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त, महापालिका आयुक्त हे देखील प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत आहेत. तसेच प्रशासनातील इतर अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे.

पुणे मनपाच्या रुग्णालयामध्ये व इतर खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना बाधित ॲडमिट होवून उपचार घेत आहेत.

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करणे, बाधित आढळल्यास त्याला ॲडमिट करणे, निगेटिव्ह आल्यास होम क्वारंटाईन अथवा मनपाच्या नियंत्रणामध्ये क्वारंटाईन करणे व तत्सम उपाययोजना चालू आहेत.

वास्तविक फिल्डवर कार्यरत असताना एखादा अधिकारी कोरोना बाधित झाल्यास त्याच्या नियंत्रणाखालील निर्णय स्थगित होवून अवलंबित्व वाढत जाते.

पुणे शहराची कोरोनाबाबत एकूण परिस्थिती पाहता नियंत्रण ठेवणारे व सक्षमपणे निर्णय घेणारे उच्चपदस्थ अधिकारी यांच्या पर्यायी पथकाची नितांत आवश्यकता आहे.

या पथकाने महापालिकेच्या मुख्य भवनातूनच सर्व कारभार पाहावा. जेणेकरून पुणे शहरातील कोरोनावरील नियंत्रण आणण्यासाठी वेळोवेळी तातडीने निर्णय घेतले जाणार आहेत, असेही हेमंत बागुल यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.